५० टक्के बसचे ब्रेक कॅचर जुनाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:07 AM2017-11-27T01:07:18+5:302017-11-27T01:07:23+5:30
एसटी महामंडळाच्या औरंगाबाद आगारातील बसेसची अत्यंत दुरवस्था झाली असून, ५० टक्के बसेसचे ब्रेक कॅचर जुनाट झाल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. हा प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद आगारातील बसेसची अत्यंत दुरवस्था झाली असून, ५० टक्के बसेसचे ब्रेक कॅचर जुनाट झाल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. हा प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकांकडे केली आहे.
‘एसटी’च्या चाकामध्ये ब्रेक लागण्याच्या दृष्टीने ‘कॅचर’ नावाचा महत्त्वाचा भाग (पार्ट) असतो. गेल्या काही दिवसांत अनेक बसगाड्यांचे ब्रेक कॅचर जुने झाल्याने योग्य काम करीत नसल्याच्या तक्रारी कर्मचा-यांतून होत आहेत; परंतु तरीही ब्रेकची कामे व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची ओरड होत आहे. २१ आॅक्टोबर रोजी ब्रेक नादुरुस्त असताना बस पुण्याला पाठविण्याचा प्रकार झाला होता.
चिकलठाणा विमानतळासमोर औरंगाबाद-अकोला बसचे ब्रेक नादुरुस्तीची घटना घडली, तर विभागीय कार्यशाळेत काम करून आलेल्या बसचे औरंगाबाद-पैठण मार्गावर ब्रेक कॅचर निघाले. दोन्ही घटनांच्या वेळी चालकांचे प्रसंगावधान राखून बस नियंत्रण राखले. बसच्या देखभाल-दुरुस्तीचे काम योग्य होत नसल्याने हा प्रकार होत आहे. दुरुस्तीसाठी साहित्य नसेल तर अशा एसटी बस बाजूला ठेवल्या पाहिजेत,अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे संघटक सुरेश जाधव यांनी केली.