मराठवाड्यातील खरीपाची ५० टक्के पिके धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 04:19 AM2018-09-15T04:19:12+5:302018-09-15T06:15:28+5:30
मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी संकटात सापडला आहे
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी संकटात सापडला आहे. कमी पावसामुळे खरिपाचे उत्पादन सुमारे ५० टक्क्यांनी घटेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. आता परतीच्या पावसाने हात दिला तरी त्याचा फायदा रबी हंगामातील पिकांनाच होईल.
गेल्या २४ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आजवर ८० टक्क्यांपर्यंत पाऊस होणे अपेक्षित असताना ६१ टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला आहे. पावसाळ्याच्या १०८ दिवसांपैकी ६५ दिवस कोरडे गेले आहेत. त्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप हंगामातील पिके संकटात आहेत. सर्वच आठही जिल्ह्यांतील खरीप उत्पादन घटण्याची शक्यता कृषी विभागाने विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या अहवालात वर्तवली आहे.
कापसावर संकट
पावसाअभावी कापूस उत्पादनात ४० टक्के घट होणे शक्य आहे. ४ लाख ४६ हजार हेक्टरवर तूर लागवड करण्यात आली तरी उत्पादन घटणार. मूग व उडीद पिकांच्या उत्पादनात तब्बल ५० ते ६० टक्के , तर सोयाबीनच्या उत्पादनात २५ टक्के घट होईल.