५० टक्के कर्मचारी उपस्थिती फक्त नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:02 AM2021-03-25T04:02:07+5:302021-03-25T04:02:07+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीच्या शासन आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन सुरू आहे. मार्च ...
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीच्या शासन आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन सुरू आहे. मार्च एंड असल्यामुळे जवळपास सर्वच कार्यालयांमध्ये १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असल्याचे दिसते आहे. ५० टक्के कर्मचारी उपस्थिती नावालाच आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालये मिळून १२२७ कर्मचारी कामावर आहेत. ते सगळे बुधवारी कामावर हजर होते. वसुली, परवानग्या, नोंदण्या या सगळ्यांच्या टार्गेटसाठी सर्व कर्मचारी कामावर आहेत.
जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. शहर रात्री ८ वाजताच बंद होत आहे. शासकीय कार्यालये निर्धारित वेळेत सुरू होत असली तरी मार्च अखेरमुळे जिल्हाधिकारी कार्यालय, मुद्रांक कार्यालय, तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी कमी होण्यास तयार नाही.
अँटिजेन टेस्ट प्रवेशद्वारावरच केली जात आहे. रोज ४ ते ५ नागरिक चाचण्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. सुरुवातीला अभ्यागतांसाठी चाचणी बंधनकारक केल्यामुळे कार्यालयात येणाऱ्यांची संख्या रोडावली होती; परंतु नागरिकांनी वेगवेगळ्या मार्गांनी कार्यालयात प्रवेश मिळवीत त्या चाचणीला देखील फाटा दिला. विनाकारण कार्यालय आवारात फिरणाऱ्यांची गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येते.
कोरोनाचे एकूण रुग्ण ७०५५१
बरे झालेले रुग्ण ५६१३८
उपचार सुरू असलेले रुग्ण १२९४९
कोरोनाचे बळी १४६४
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या २० शाखा आहेत. मार्च अखेरमुळे या शाखांच्या बेबाकीची गरज अनेकांना असते. त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवेशद्वारावरच अँटिजेन टेस्ट करण्यात येत असली तरी ती टेस्ट अभ्यागतांची होत आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नाही. बुधवारी कार्यालयात जवळपास सर्व कर्मचारी कामावर होते.
जिल्हा मुद्रांक कार्यालय
३१ मार्चपूर्वी दस्त नोंदणी केल्यास सवलत मिळणार आहे. त्यासाठी मुद्रांक कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात असले तरी गर्दी कमी होत नाही. कार्यालयातील सहा कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. ऑनलाईन प्रक्रिया करून घेण्याऐवजी दस्तनोंदणीसाठी प्रत्येक जण कार्यालयातच येत आहे. मुद्रांक विभागात ३० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर गर्दीचा ताण पडतो आहे.
जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेतील तीन मोठे विभाग स्थलांतरित झाले आहेत. अर्थसंकल्प तयारीनिमित्त सर्व कर्मचारी कामावर होते. प्रवेशद्वारावरच अँटिजेन चाचणी होत असल्यामुळे काम असलेले नागरिकच जि. प. आवारात होते. परिषदेच्या आवारात असलेले सर्व विभाग नियमित सुरू होते. कर्मचाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के होती. निवृत्तिवेतन, बँकेचे व्यवहार, कंत्राटदारांची देणी, यासाठी येणाऱ्यांची कार्यालयात गर्दी होती.
कार्यालयात गर्दी कशासाठी ?
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात दोन तहसील, एक उपविभागीय आणि मुद्रांक विभागाचे कार्यालय आहे. सेतू कार्यालय आहे. १२०० च्या आसपास कर्मचाऱ्यांची संख्या या कार्यालय आवारात आहे. यापेक्षा पाचपट नागरिकांची गर्दी परिसरात दिसते आहे. मुद्रांक नोंदणीसाठी, सेतूमधून सामाजिक उपयोगांचे प्रमाणपत्र काढण्यासाठी, तहसीलमध्ये सुनावणी व इतर कर भरण्यासाठी, उपविभागीय कार्यालयात सुनावणीसाठी, तर जिल्हाधिकारी कार्यालयात परवाना शुल्क आणि भूमापन कार्यालयात नागरिक गर्दी करीत आहेत.
नागरिकांच्या प्रतिक्रिया
मार्च अखेर आहे. तसेच तीन दिवस सुट्या आहेत. त्यामुळे सरकारी दप्तरी असलेली कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागले.
ज्ञानेश्वर डांगे, मुकुंदवाडी
मुद्रांक विभागात नोंदणीसाठी सवलत आहे. त्यामुळे दस्त नोंदणी ३१ मार्चपूर्वी करण्यासाठी कार्यालयात यावे लागले. ऑनलाईन प्रक्रियेत नेटवर्कच्या अडचणी आल्याने येथे आलो.
गणेश गांगवे, एन-१, टाऊन सेंटर
निवृत्तिवेतन संबंधातील काही कागदपत्रे विभागात जमा करण्यासाठी आलो होतो. बँकेतही काम होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत यावे लागले.
शांताराम पाटील, सिल्लोड