घाटीत ५० व्हेंटिलेटर, १०० खाटांची जुळवाजुळव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:05 AM2021-03-20T04:05:07+5:302021-03-20T04:05:07+5:30

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत ७२ बाधित रुग्णांना भरती करून घेण्यात आले. सध्या कोरोना संदर्भातील ५९५ रुग्ण ...

50 ventilators and 100 beds in the valley | घाटीत ५० व्हेंटिलेटर, १०० खाटांची जुळवाजुळव सुरू

घाटीत ५० व्हेंटिलेटर, १०० खाटांची जुळवाजुळव सुरू

googlenewsNext

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत ७२ बाधित रुग्णांना भरती करून घेण्यात आले. सध्या कोरोना संदर्भातील ५९५ रुग्ण भरती असून, त्यापैकी २५१ रुग्ण सामान्य असून, २६४ रुग्ण गंभीर स्थितीतील आहेत. घाटीत असलेले १०० हून अधिक व्हेंटिलेटर रुग्णसेवेत अडकलेले असून, आणखी ५० व्हेंटिलेटरची आणि १०० खाटांची जुळवाजुळव सुरू असल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे कागिनाळकर यांनी दिली.

घाटीतील ११७७ खाटांपैकी सध्या ५५० खाटांवर कोविड रुग्ण उपचाराची सुविधा आहे. त्यापेक्षा अधिक रुग्ण सध्या भरती होण्यासाठी येत आहेत. गंभीर नसलेले आणि ऑक्सिजन लावण्याची आवश्यकता नसलेले बाधित रुग्ण घाटीतून मेल्ट्राॅन हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी बोलणे झाले असून, त्यासंबंधी रुग्ण स्थलांतरणाचे काम पुढील दोन दिवसांत सुरू होईल. त्यामुळे गंभीर रुग्णांना घाटीत खाटांची उपलब्धता होण्यासाठी मदत होईल, असे डॉ. वर्षा रोटे कागिनाळकर म्हणाल्या. तर पुढील १० दिवस पुरेल एवढा औषध साठा असून, आवश्यक त्या मदतीची ग्वाही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

---

बाधित ४८ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू

घाटीतील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, परिचारिका, तंत्रज्ञ, कर्मचारी असे बाधित ४८ जणांवर सध्या सुपरस्पेशालिटी विंगसह विविध वार्डांत उपचार सुरू आहेत. त्यांना मुत्रपिंड विकार विभागाच्या पहिल्या मजल्यावर हलवण्यात येणार आहे. या ठिकाणी ७४ खाटांची तर मेडिसीन इमारतीत २४ खाटा तर सर्जीकल इमारतीतही वार्ड १८ मध्ये २४ खाटा अशी शंभर खाटांची व्यवस्था पुढील दोन दिवसांत वाढली, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले.

---

नाॅनकोविड रुग्णसेवा विस्कळीत होण्याची चिंता

घाटीत प्रत्यक्षात २५० खाटांची सुपरस्पेशालिटी विंग वगळता ८५० खाटांच आहेत. एमसीआयच्या नियमांसाठी घाटीत ११७७ खाटांची व्यवस्था अतिरिक्त बेड टाकून विविध वार्डांत होते; मात्र ८५० खाटांवर कोविड रुग्णसेवेसाठी राखीव केल्यावर मोजक्याच खाटा नाॅनकोविड रुग्णांसाठी उपलब्ध राहतील. त्यामुळे नाॅनकोविड रुग्णसेवेचे टर्शरी केअर सेंटरची सेवा विस्कळीत होण्याची चिंता घाटीतील तज्ज्ञ प्रशासनातून व्यक्त होत आहे.

---

५०० मनुष्यबळाची गरज

कोरोनासाठी साडेआठशे खाटांची उपलब्धता करण्यासाठी घाटीकडून ८५८ खाटांसाठी ५०० मनुष्यबळाचा ४ कोटी १० लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील तीन महिन्यांच्या व्यवस्थेसाठी दिला आहे. यापूर्वी २५० खाटांसाठी १५५ पदांचा ९७ लाखांचा तर ४५० खाटांसाठी ३५७ पदांचा २.११ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, त्यानुसार मनुष्यबळ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात ४० डॉक्टर, २०० परिचारिका, २५० चतुर्थश्रेणी कर्मचारी, २० वैद्यकीय अधिकारी, ६ वैद्यकीय जनसंपर्क अधिकारी, ६ वैद्यकीय समुपदेशक, ५ रुग्णवाहिकांसह चालक, ५ समाजसेवा अधीक्षक, २२ तंत्रज्ञ, ४ स्टेनो, २ बायोमेडिकल इंजिनीयर आदी पदांचा समावेश असल्याचे उपाधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: 50 ventilators and 100 beds in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.