५०० 'बुलेट'राजांचा पोलिसांनी ५ तासात वाजवला 'बाजा'; 'फटाका' सायलेन्सर घेतले काढून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 01:15 PM2023-03-22T13:15:18+5:302023-03-22T13:15:49+5:30

गुन्हे शाखा, वाहतूक पोलिसांची कारवाई; फटाका बुलेट मालकांना कारवाईचा फटका

500 'Bullets' were fined by the police in 5 hours in Chhatrapati Sambhajinagar | ५०० 'बुलेट'राजांचा पोलिसांनी ५ तासात वाजवला 'बाजा'; 'फटाका' सायलेन्सर घेतले काढून

५०० 'बुलेट'राजांचा पोलिसांनी ५ तासात वाजवला 'बाजा'; 'फटाका' सायलेन्सर घेतले काढून

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : फाट... फाट... फटाके फोडत गाड्या पळविण्याच्या लागलेल्या स्पर्धेकडे अखेर शहर पोलिसांची नजर वळली आहे. आवाजासाठी सायलेन्सर लावून गाडीत बदल करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे शाखा आणि वाहतूक पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी जोरदार माेहीमच उघडली. फक्त ५ तासातच ५०० 'बुलेट'स्वारांचा पोलिसांनी 'बाजा' वाजविला.

वाहतूक पोलिसांनी ३८२, गुन्हे शाखेने ११८ जणांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त दिलीप गांगुर्डे व गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त अविनाश आघाव यांनी दिली. पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शहरात मोठ्या आवाजात बुलेट गाड्या पळविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखा, वाहतूक पोलिसांना केल्या होत्या. त्यानुसार दोन्ही विभागाच्या विविध पथकांनी मंगळवारी सायंकाळी ४ वाजेनंतर कारवाईला सुरुवात केली. रात्री ९ वाजेपर्यंत ही मोहीम चालली. त्यामध्ये शहरातील गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी ११८ बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला. त्याचवेळी वाहतूक विभागाने ३८२ बुलेटची तपासणी केली. त्यातील १४५ दुचाकींच्या सायलेन्समध्ये बदल केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावला, तर २३७ जणांवर विविध नियमांचा भंग केल्याबद्दल दंड केल्याचे प्रभारी एसीपी गांगुर्डे यांनी सांगितले.

सायलेन्सर काढून घेतले
गुन्हे शाखेच्या पथकांनी ज्या बुलेटस्वारांनी आवाजासाठी सायलेन्सरमध्ये बदल केले आहेत, अशा गाड्या पकडल्यानंतर त्याचे सायलेन्सर जागेवरच काढून घेण्यात आले, तसेच त्यांना विविध कलमान्वये गाडीत बदल केल्याचा ऑनलाइन दंडही ठोठावण्यात आला.

सिडको परिसरात सर्वाधिक कारवाई
वाहतूक पोलिसांनी सिडको विभागात १४७ बुलेटची तपासणी केली. शहर विभाग एकने ११७, शहर विभाग दोनने ७८, छावणी २१ आणि वाळूज विभागाने १९ बुलेटवर कारवाई केली. गुन्हे शाखेने शहरभरात ११८ जणांवर कारवाई केली.

Web Title: 500 'Bullets' were fined by the police in 5 hours in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.