५०० ट्रक चोरी प्रकरण : आरोपींकडून बारा ट्रक, एक कार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:44 PM2018-05-15T13:44:47+5:302018-05-15T13:46:55+5:30
वाहनांचा रंग, इंजिन आणि चेसिस क्रमांक बदलून वाहनांची विक्री केलेल्या टोळीकडून शहर पोलिसांनी आतापर्यंत १२ ट्रक आणि एक कार जप्त केली.
औरंगाबाद : वाहनांचा रंग, इंजिन आणि चेसिस क्रमांक बदलून वाहनांची विक्री केलेल्या टोळीकडून शहर पोलिसांनी आतापर्यंत १२ ट्रक आणि एक कार जप्त केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात केली. भिवंडी पोलिसांनी अटक केलेल्या एमआयएम नगरसेवक जफर शेख याचा भाऊ शेख बाबर शेख अख्तर याला भिवंडी पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेत त्याला पुढील तपासासाठी अटक केली.
औरंगाबादेत याप्रकरणी एक गुन्हा सिडको ठाण्यात, तर दुसरा एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद आहे. गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकॉ सुभाष शेवाळे, सतीश हंबर्डे, सय्यद अश्रफ, सिद्धार्थ थोरात, लालखा पठाण, नितीन धुळे, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण आणि धर्मराज गायकवाड यांनी कसाबखेडा, वाळूज, पाचोड, सिल्लोड, तसेच इतर ठिकाणाहून आतापर्यंत बारा ट्रक आणि १ कार जप्त केली. जप्त वाहनांची आरटीओ अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे, तसेच टाटा कंपनीच्या वाहनांची तपासणी करण्यासाठी जमशेदपूर येथून पथक बोलावले जाणार आहे. शेख बाबर याच्याकडून जप्त केलेली कारही चोरीची असल्याचे आणि याविषयी खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आरोपी वापरायचा सात मोबाईल सीम
पोलिसांपासून वाचण्यासाठी शेख बाबर हा सात सीमकार्ड व मोबाईल वापरत होता. ठिकाण बदलण्यासाठी तो सीमकार्डचा वापर करायचा, असेही तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात विविध आरटीओ कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी आणि फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर येत असून, लवकरच अधिकाऱ्यांना अटक केली जाऊ शकते, असेही पोलिसांनी सांगितले.