मनोज जरांगेंच्या छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत ५०० स्वयंसेवक, २५० ट्रॅक्टर अन् १० ॲम्ब्युलन्स
By बापू सोळुंके | Published: July 10, 2024 01:57 PM2024-07-10T13:57:13+5:302024-07-10T13:57:49+5:30
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीचा १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगरात समारोप
छत्रपती संभाजीनगर : सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करा आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत, इ. मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी १३ जुलै रोजी सिडकोतील वसंतराव नाईक चौक ते क्रांती चौक महाशांतता रॅलीचे आयोजन केले आहे.
रॅलीच्या पाच किलोमीटर मार्गावर २५० ट्रॅक्टर, ५०० स्वयंसेवक, १० ॲम्ब्युलन्स असतील. लाखो समाजबांधव एकवटणार असल्याने त्यांच्यासाठी चहा, नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली. रॅलीमार्गावर १० रुग्णवाहिका आणि १० फिरती स्वच्छतागृहे ठिकठिकाणी तैनात असतील. पोलिस प्रशासनाकडूनही वाहतूक व्यवस्थेत बदल केला जाणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी मराठवाड्यात आयोजित केलेल्या महाशांतता रॅलीचा १३ जुलै रोजी शहरात समारोप होईल. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या या रॅलीचा समारोप क्रांती चौक येथे सायंकाळी ५ वाजता होईल. तेथे भव्य स्टेज उभारले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजबांधवांनी सहभागी व्हावे, यासाठी विविध गावांत आणि तालुक्यांच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बैठका घेत आहेत. रॅलीमध्ये खुलताबाद तालुक्यातील मराठा बांधव २५० ट्रॅक्टरसह सहभागी होतील.
पाच- सहा ठिकाणी वाहनतळ
पाच ते सहा ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पैठण तालुक्यातून येणाऱ्यांसाठी बायपासवरील जबिंदा मैदान, कन्नड, खुलताबाद आणि वैजापूर, गंगापूरकडून येणाऱ्यांसाठी कर्णपुरा मैदान, अयोध्या मैदान येथे, तर फुलंब्री आणि सिल्लोड येथील बांधवांसाठी जाधववाडी (नवा मोंढा) येथे वाहनतळ असेल. जालन्याकडून येणाऱ्यांंसाठी चिकलठाणा एमआयडीसीत वाहनतळ असेल.
रॅलीमार्गावर १० रुग्णवाहिका
रॅलीमध्ये महिलांचाही सहभाग असणार आहे. रॅलीदरम्यान कोणाला काही त्रास जाणवत असल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी अत्याधुनिक १० ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यात तज्ज्ञ डॉक्टर आणि अनुभवी नर्स औषधोपचारासह सज्ज असतील.
पोलिस आयुक्तांची बुधवारी बैठक
रॅलीमुळे शहराची ‘लाइफलाइन’ म्हणून ओळखला जाणारा जालना रोड शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत ठप्प होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे.
रॅली मार्गावर २५० ठिकाणी लाऊडस्पीकर
रॅलीत सहभागी प्रत्येक व्यक्तीने शिस्त पाळावी आणि शांततेत सहभाग नोंदवावा, यासाठी त्यांना सूचना देण्यासाठी रॅलीमार्गावर २५० ठिकाणी लाऊडस्पीकर असतील. यामुळे सर्वांना एकाच वेळी या साऊंड सिस्टमच्या माध्यमातून निरोप दिला जाईल.
५०० स्वयंसेवकांची नजर
आमची ही रॅली शांततामय असेल. यात कोणालाही त्रास होणार नाही. ५०० स्वयंसेवक असतील. शिवाय पोलिस प्रशासनासोबत बुधवारी आमची बैठक आहे.
- प्रा. चंद्रकांत भराट, मुख्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
पावसाची काळजी घ्या
पावसाचे दिवस असल्याने छत्री, गोणपाट घेऊन जास्तीत जास्त मराठा समाजबांधव सहभागी होऊन आपली शक्ती दाखवतील.
- सुरेश वाकडे, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा