कोरोना मृतांच्या नातेवाईकांना ५० हजारांचे सहाय्य; 'या' संकेतस्थळावरून करा ऑनलाईन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 12:23 PM2021-12-02T12:23:01+5:302021-12-02T12:24:55+5:30
केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-१९ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल.
मुंबई/औरंगाबाद : कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास ५० हजार रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. या शासन आदेशानुसार सरकारने ऑनलाईन संकेतस्थळ विकसित केले असून, याद्वारे कोरोना मृतांच्या नातेवाईकांना सानुग्रह मदत प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.
यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक आहे. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन लॉगिन करता येईल.
केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-१९ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोव्हिड-१९ मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहणार आहेत.
रक्कम थेट बँक खात्यात जमा
सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज ७ दिवसांसाठी संकेतस्थळावर सार्वजनिक करण्यात येतील. त्यामुळे मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे यासाठी त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकणार आहे. अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.