मराठवाड्यातील धरणांमध्ये ५०.५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 07:00 PM2017-09-14T19:00:27+5:302017-09-14T19:12:30+5:30

गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या ५०.५ टक्के इतका पाणीसाठा आहे.  राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

50.5% water in Marathwada dams | मराठवाड्यातील धरणांमध्ये ५०.५ टक्के साठा

मराठवाड्यातील धरणांमध्ये ५०.५ टक्के साठा

googlenewsNext
ठळक मुद्दे गेल्यावर्षी याच सुमारास ८५ टक्के पाऊस झाला होता, तर धरणांमध्ये ६८ टक्के साठा होताराज्यातील ३१२ गावे आणि १५०४ वाड्यांना सध्या ३०२ टँकरमार्फत पाणीपुरवठा 

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या ५०.५ टक्के इतका पाणीसाठा आहे. 
 राज्यातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणांच्या साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. जूनपासून आतापर्यंत झालेल्या सरासरीच्या ७८ टक्के पावसामुळे धरणांमध्ये एकूण ६७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी याच सुमारास ८५ टक्के पाऊस झाला होता, तर धरणांमध्ये ६८ टक्के साठा होता. 
 राज्यात १ जून ते ११ सप्टेंबर अखेरपर्यंत ७८७.१ मि. मी. इतका पाऊस झाला. हा पाऊस सरासरीच्या ७७.९ टक्के एवढा आहे. गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या ८५.४ टक्के एवढा झाला होता. सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्याची वर्गवारी अशी आहे: बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, रायगड, पालघर, ठाणे, पुणे या सात जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. जालना, लातूर, बुलडाणा, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली या बारा जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस पडला. औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चौदा जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के पाऊस पडला. यवतमाळ या एका जिल्ह्यात २६ ते ५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. 
राज्यातील ३१२ गावे आणि १५०४ वाड्यांना सध्या ३०२ टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरु आहे. गेल्या वर्षी याच दिवसात १४४ गावे आणि ६८० वाड्यांसाठी २०४ टँकर्स सुरु होते. प्रामुख्याने औरंगाबाद, बुलडाणा, अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

Web Title: 50.5% water in Marathwada dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.