हिवाळा संपताच पाण्यासाठी भटकंती; छत्रपती संभाजीनगर जिल्हयासाठी ५२ कोटींचा कृती आराखडा
By विजय सरवदे | Published: February 19, 2024 06:06 PM2024-02-19T18:06:26+5:302024-02-19T18:07:47+5:30
फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या आहेत, तर उन्हाळ्यात काय स्थिती राहील?
छत्रपती संभाजीनगर : सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याच्या सर्व स्रोतांची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील सुमारे ३५० गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी जि. प. पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते जूनपर्यंत ५१ कोटी ६६ लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे.
अजून हिवाळा संपला नाही तोच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ११५ गावे आणि २६ वाड्यांना १६७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईच्या अनुषंगाने प्रशासनाने ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीसाठी प्रत्येकी तीन महिन्यांच्या तीन टप्प्यांत टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. या तीन टप्प्यांत एकूण २०५५ योजनांवर ८१ कोटी ४० लाख २६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. संबंधित योजना १३१० गावांमध्ये राबविण्यात येत आहेत.
फेब्रुवारी महिन्यात सुमारे दीडशे गावांना पाणीटंचाईच्या झळा बसलेल्या आहेत, तर उन्हाळ्यात काय स्थिती राहील? त्यामुळे आतापासूनच प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने विहीर अधिग्रहण, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, नवीन विंधन विहीर आदी उपाययोजना टंचाई कृती आराखड्यात प्रस्तावित केल्या आहेत. दरम्यान, सध्या टंचाईसंबंधीच्या उपाययोजनांवर भर देण्यात आल्यामुळे मार्चपासून पुढील कालावधीत टँकरची संख्या थोडीफार कमी होईल, अशी शक्यता पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी वर्तविली आहे.
ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ पर्यंत उपाययोजनांची स्थिती
तालुके - गावे - योजनांची संख्या - खर्च
छत्रपती संभाजीनगर - १८१ - १८६ - ११ कोटी ५७ लाख
फुलंब्री - १०३ - १२२ - ५ कोटी ३८
सिल्लोड - ११२ - १८५ - १७ कोटी ७३ लाख
सोयगाव - ११९ - ११९ - १ कोटी ४७ लाख
कन्नड - १५३ - १५३ - ५ कोटी ९१ लाख
खुलताबाद - ८९ - ८९ - ५ कोटी ६७ लाख
गंगापूर - २२५ - ४६३ - ११ कोटी ६० लाख
वैजापूर - १६० - २९२ - ११ कोटी ३६ लाख
पैठण - १६८ - ४४६ - १० कोटी ७० लाख