उस्मानाबाद जिल्ह्यातील ५१ प्रकल्पांमध्ये ठणठणाट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 07:11 PM2018-12-14T19:11:53+5:302018-12-14T19:42:55+5:30
प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना सध्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दिवसागणिक टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.
उस्मानाबाद : जिल्ह्यात अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ४० ते ४२ टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे प्रकल्पांची पाणी पातळीही फारशी उंचावली नव्हती. परिणामी हिवाळ्यातच प्रकल्पांच्या घश्याला कोरड पडू लागली आहे. आजघडीला जिल्हाभरातील सुमारे ५१ प्रकल्पांमध्ये ठणठणाट निर्माण झाला आहे. तर ९९ तलाव जोत्याखाली गेले आहेत. परिणामी सदरील प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांना सध्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दिवसागणिक टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.
जिल्ह्यात लहान, मोठ्या व मध्यम प्रकल्पांची संख्या साधापणे २२३ एवढी आहे. गतवर्षी जिल्हाभरात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे बहुतांश प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा होता. परंतु, यंदा वार्षिक सरासरीच्या अल्प पाऊस पडला. परिणामी जिल्हाभरातील लघु, मध्यम तसेच मोठे प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले नाही. ज्या प्रकल्पांमध्ये थोडाबहुत साठा झाला आहे, तोही झपाट्याने कमी होऊ लागला आहे. आजघडीला एकाही प्रकल्पामध्ये शंभर टक्के पाणीसाठा उरलेला नाही. १०० ते ७५ टक्क्यांदरम्यान साठा असलेल्या प्रकल्पांची संख्या अवघी सहा एवढी आहे. अशीच अवस्था पन्नास टक्क्यांवर साठा असलेल्या प्रकल्पांची आहे.
एक मध्यम आणि १० लघु प्रकल्पांतच ५१ ते ७५ टक्क्यांदरम्यान साठा उरला आहे. २६ ते ५० टक्क्यांदरम्यान दोन मध्यम आणि १८ लाघु प्रकल्पांमध्ये साठा आहे. २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा असलेल्या प्रकल्पांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. आजघडीला ही संख्या ३६ च्या आसपास जावून ठेपली आहे. तर ९९ प्रकल्पांची पाणीपातळी ज्योत्याखाली गेली आहे. ज्यामध्ये चार मध्यम प्रकल्प, १ मोठा प्रकल्प आणि ९४ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. दरम्यान, प्रकल्प कोरडे पडण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढू लागले आहे. तीन मध्यम आणि ४८ लघु असे एकूण ५१ प्रकल्पांच्या घश्याला कोरड पडली आहे. त्यामुळे या गावांवर अवलंबून असेल्या ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. भविष्यात ही परिस्थिती आणखी विदारक होईल, असे पाटबंधारे विभागातील अधिका-यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मध्यम प्रकल्पांतील साठा चिंताजनक
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची संख्या साधारपणे १७ एवढी आहे. आजघडीला रूई, वाघोली, रायगव्हाण, खासापूर, चांदणी, खंडेश्वर, साकत या प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठाही उरलेला नाही. तर उर्वरित प्रकल्पांतील उपयुक्त साठाही चिंताजनक अवस्थेत आहे. तेरणा प्रकल्पांमध्ये १.५३८ दलघमी, बाणगंगा प्रकल्पात २.०१७, रामगंगा ०.५६३, संगमेश्वर ०.१९९, कुरनूर ४.८३०, हरणी ३.१६०, खंडाळा ०.७३३, जकापूर ६.१९६, तुरोरी ३.४३८ आणि बेन्नीतुरा प्रकल्पामध्ये १.७४९ दलघमी उपयुक्त साठा उरला आहे. यापैकी अनेक प्रकल्पांतून पाणीउपसा सुरू असल्याने जलस्तर झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
तुलनात्मक चित्र...
प्रकल्प प्रकार यंदा गतवर्षी
मोठे ००.०० ८९.९५ टक्के
मध्यम १२.४५ ८२.०८ टक्के
लघु १२.५० ५३.०३ टक्के
एकूण ११.१२ ६५.४६ टक्के
(कंसातील टक्केवारी उपयुक्त साठा दर्शवते)