नावीन्यपूर्ण योजना! कामगार कुटुंबातील मुलींसाठी ५१ हजारांचे ‘कन्यादान’ योजना
By साहेबराव हिवराळे | Published: March 5, 2024 07:34 PM2024-03-05T19:34:16+5:302024-03-05T19:34:40+5:30
कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी हिताचा आणखी एक उपक्रम
छत्रपती संभाजीनगर : हंगामी कामगार मजूर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी शासनाने विविध उपक्रम आणले असून, आता कन्यादान म्हणून मुलींच्या विवाहात ५१ हजार रुपये देण्यात येत आहेत.
कामगार उपायुक्त कार्यालयात दिलेल्या ऑनलाइनच्या साइटवर जाऊन कामगार पाल्याचा विवाह झाला असेल आणि रीतसर नोंदणी अपडेट केलेली असेल तर त्यास ५१ हजारांचा धनादेश कामगार उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात येतो. त्यातून विवाहाला मोलाचा हातभार लागणे म्हणजे डोक्यावरील मोठे ओझे कमी झाल्याचा सुखद अनुभव छत्रपती संभाजीनगरातील अनेक कामगारांना आलेला आहे. काही जण ऑनलाइन लागणारी विविध कागदपत्रांची पूर्तता करीत आहेत.
ऑनलाइन अर्ज करूनही अनेकजण प्रतीक्षेत..
हंगामी कामगारांना बांधकाम साहित्याची किट; तसेच संसारोपयोगी साहित्यही देण्यात आलेले आहे. शैक्षणिक साहित्यासाठी शिष्यवृत्ती दिली; परंतु मुलीच्या विवाहाची सर्वांत मोठी चिंता पालकांना भेडसावते. याबाबतही कामगारांनी ऑनलाइन अर्ज केलेले असून, ते प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या खात्यावर निधी त्वरित टाकावा, जेणेकरून कुटुंबाला हातभार लागेल.
- प्रेम चव्हाण, कामगार नेता
ठेकेदारांकडून अपेक्षा
अनेक हंगामी मजुरांना शक्यतो खेड्यात हाताला काम नसल्याने शहरात यावे लागते. मूलभूत हक्कांची त्यांना जाणीव नसते. खरे तर ठेकेदारांनीही अशा कामगारांची रीतसर नोंदणी करून त्यांना त्यांच्या हक्काची मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- विनोद कोरके, कामगार नेता
ऑनलाइन रीतसर अर्ज भरावा..
कोणत्या तालुक्यात आणि शहरातील कोणत्या भागांत मुलीचा विवाह झाला, तिच्या विवाहाचा दाखला, पत्रिका आणि साक्षीदार अशा महत्त्वाच्या कागदपत्रांची नोंद घेतलेली असावी. कामगारांनी स्वत: ऑनलाइन अर्ज कार्यालयाकडे सादर करावा.
- जी. बी. बोरसे, सहायक आयुक्त.