जलयुक्त योजनेतून ५१८ कोटींचा गाळ उपसला; २२९ कोटींचे काम लोकसहभागातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:56 PM2020-10-20T12:56:20+5:302020-10-20T12:57:55+5:30
Jalyukta Shiwar scheme : मराठवाड्यात लहान-मोठे प्रकल्प, तलाव व नद्यांमधून गाळ काढण्याचे काम करण्यात आले.
औरंगाबाद : मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेत गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरणाची मोठ्या प्रमाणावर कामे केली होती. योजनेच्या काळात लोकसहभागातून ७२०.३९ लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला. त्या कामाची किंमत ५१८.६९ कोटी रुपये असून, त्यातील २२९.७८ लाख रुपयांची कामे लोकसहभागातून झाली आहेत.
मराठवाड्यात लहान-मोठे प्रकल्प, तलाव व नद्यांमधून गाळ काढण्याचे काम करण्यात आले. योजनेत पहिल्याच वर्षी गाळ काढण्याचे सर्वाधिक काम झाले. २०१५-१६ यावर्षी शासकीय यंत्रणेकडून १८५.४५ लक्ष घनमीटर गाळ उपसण्यात आला, तर त्याच वर्षी लोकसहभागातून २५५.५४ लक्ष घनमीटर गाळ उपसण्यात आला. २०१६-१७ यावर्षी लोकसहभागातून विविध प्रकल्पांतून १४४.५० लक्ष घनमीटर, तर २०१७-१८ यावर्षी १.२२ लक्ष घनमीटर गाळ उपसला.
जलयुक्त शिवार योजनेत २०१५-१६ ते २०१८-१९ या वर्षासाठी निवडलेल्या ६ हजार २० गावांमध्ये गाळ काढण्याची ७ हजार ९३ कामे पूर्ण करण्यात आली. यामध्ये शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ४ हजार ४१४, तर लोकसहभागातील २ हजार ६७९ कामांचा समावेश आहे. या संपूर्ण कामांची किंमत ५१८ कोटी ६९ लाख असल्याची नोंद शासन दप्तरी आहे. कॅगने जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढल्यानंतर राज्य शासनाने एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ही योजना चर्चेत आली आहे.
वर्ष एकूण कामे अंदाजित रक्कम
२०१५-१६ ४,२०० ३१७.५१
२०१६-१७ २,१९१ १७६.६८
२०१७-१९ ७०२ २५.५०
एकूण ७,०९३ ५१८.६९