सायबर गुन्ह्यात ५२ टक्के पैसे झारखंड, बिहारच्या बँक खात्यात; रोख काढतात मात्र दिल्लीतून
By सुमित डोळे | Published: November 29, 2023 05:21 PM2023-11-29T17:21:15+5:302023-11-29T17:21:26+5:30
सायबर गुन्ह्यांसाठी सर्वाधिक सीमकार्ड प. बंगाल मधून विकत घेतली जातात; सायबर पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर
छत्रपती संभाजीनगर: तंत्रज्ञानाच्या बदलांसह विविध प्रकारे प्रलोभन दाखवून, फसवणुकीचे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वेगाने वाढले. गेल्या १० महिन्यात शहरातील १६८१ नागरिक सायबर गुन्ह्यांत फसले गेले. यात ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम सायबर गुन्हेगारांनी लंपास केली. सायबर पोलिसांना यापैकी ७० लाख रुपये थांबवण्यात यश आले. परंतु यातील ५२ टक्के रक्कम ही झारखंडमध्ये तर १६ टक्के रक्कम एकट्या बिहार राज्यात गेली आहे. हे पैसे जरी मुख्यत्वे सहा ते सात राज्यातील बँक खात्यात जमा होत असले तरी ८० टक्के रक्कम दिल्लीतून रोखीत बदलली जात असल्याचेही सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
गेल्या ४ वर्षांत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण १४० टक्क्याने वाढले. हनिट्रॅप, ऑनलाईन टास्क, इन्स्टंट लोन, ऑनलाईन जाॅब, घरबसल्या नोकरीचे आमिष, वीजबिलासारख्या विविध कारणांखाली हजारो नागरिकांना सायबर गुन्हेगारांनी कोट्यवधींचा गंडा घातला. यात प्रामुख्याने नवरात्र, दिवाळीत भरघोस डिस्काऊंटच्या नावाखाली फसवणुकीच्या तक्रारींचा ओघ दुपटीने वाढला.
ग्रामीण पेक्षा सुशिक्षित शहरी अधिक बळी
सायबर विभागाच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या माहितीनुसार, ग्रामीणच्या तुलनेत शहरात सुशिक्षित वर्ग ऑनलाईन फसवणुकीला अधिक बळी पडत आहे. बिहार, झारखंड, राजस्थानच्या विरळ भागातून हे रॅकेट चालवले जाते. शिवाय, बँक खाते एका राज्यात तर पैशांचा वापर मात्र अन्य राज्यातून होत असल्याने तपासात मोठ्या अडचणी येतात. तरीही गेल्या १० महिन्यांमध्ये १११ तक्रारदारांचे ७० लाख रुपये वाचवण्यात पोलिसांना यश आले. यादव यांच्यासह सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, अंमलदार वैभव वाघचौरे, सुशांत शेळके, श्याम गायकवाड यांचे पथक यासाठी कार्यरत आहे.
ठाणे -तक्रारी - निकाली - तपासावर - मागील प्रलंबित
सायबर पोलिस ठाणे - १०४ - ३१- ७३ - ७२
अन्य पोलिस ठाणे - १५७७ - २६६ - १३११ - १४०४
सर्वाधिक झारखंड राज्यातून वसूली
सायबर पोलिसांनी वसूल केलेल्या ७० लाखांपैकी सर्वात जास्त ३१ लाख रुपये झारखंड, १६ लाख नोएडा, १४ लाख दिल्ली तर ९ लाख बिहारमधून वसूल केले. बहुतांश प्रकरणात गुन्हेगार पैसे तातडीने अन्य खात्यात वळवून रोखीत बदलतात. १६८१ तक्रारीत ३ कोटींपेक्षा अधिक रक्कम देखील झारखंडमधील बँक खात्यात गेल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.
झारखंड - ५२ टक्के
बिहार - १६ टक्के
राजस्थान - १४ टक्के
नोएडा - ७ टक्के
ओडिसा - ६ टक्के
उर्वरित - ५ टक्के
१० पैकी ४ गुन्हेगार बिहारचे
- गेल्या तीन महिन्यांत सायबर पोलिसांनी ६ मोठ्या गुन्ह्यांत परराज्यात शोध घेऊन १० आरोपींना अटक केली. त्यातील ४ बिहारचे होते.
-बिहार, झारखंडच्या सीमावर्ती भागात सर्वाधिक रॅकेट चालवते जाते. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मात्र जवळच्या राज्यांतील बँक खात्याचा वापर होतो.
- फसवणुकीच्या रकमेतून झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचे अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत निष्पन्न झाले. पश्चिम बंगालमधून सीमकार्ड विकत घेतले जातात. तीन ते चार राज्यांतील विविध मार्गाने रॅकेट चालवले जात असल्याने पोलिसांना देखील आरोपी निष्पन्न करणे आव्हानात्मक ठरत आहे.
हनीट्रॅप, बँकांची प्रकरणे जास्त
सायबर पोलिसांच्या मते, शहरातील १६८१ तक्रारींमध्ये सर्वाधिक फसवणूक बँक, इन्शुरन्स कंपन्यांच्या नावाखाली फसवणुकीच्या आहेत. त्याखालोखाल हनीट्रॅप, डेटिंग अॅपवरून फसवणुकीच्या तक्रारी वाढत आहेत.