५२ दारु दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:04 AM2017-09-10T00:04:05+5:302017-09-10T00:04:05+5:30
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बंद केलेली दारू दुकाने व बिअरबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला असून ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ९६ पैकी ५२ दारु दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले आहे़
मारोती जुंबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील बंद केलेली दारू दुकाने व बिअरबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला असून ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ९६ पैकी ५२ दारु दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले आहे़
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय व राज्य मार्गावरील ५०० मीटरच्या आतील दारु दुकाने व बार बंद करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला होता़ त्यामुळे १ एप्रिल २०१७ पासून जिल्ह्यातील ९६ दारु दुकाने बंद झाली होती. काही दारु दुकानदारांनी ५०० मीटरच्या बाहेर दुकान स्थलांतर केले होते़ ४ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेच मनपा, नगरपालिका, नगरपंचायतींच्या हद्दीतून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारु दुकाने सुरू करण्याचा निर्णय दिला़ त्यामुळे जिल्ह्यातील ९६ दारु दुकानदारांना दिलासा मिळाला आहे़ ५ सप्टेंबरपासून बार व दारू दुकानांच्या परवान्यांच्या नूतनीकरणासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे रीघ लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील १५५ पैकी ९६ दारू दुकाने बंद झाली होती़ त्यातील ५२ दारु दुकानदारांनी न्यायालयाच्या नवीन आदेशानुसार परवाने नुतनीकरण केले़ मनपा हद्दीत १३ बिअर शॉपी, नगरपालिका हद्दीत ३८ बार आणि जिंतूर पालिकेच्या हद्दीत एका वाईनशॉपच्या परवान्याचे नूतनीकरण झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली़