५४ उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:55 AM2017-09-19T00:55:07+5:302017-09-19T00:55:07+5:30
नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर, भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नगरपालिका निवडणूक लढविणाºया ५४ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर न करणे चांगलेच महागात पडले आहे. नगरपालिका प्रशासनाने जालना, अंबड, परतूर, भोकरदन येथील ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. सोमवारी हा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत गॅझेटमध्ये नोंद करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
मागील वर्षी जालना, परतूर, अंबड व भोकरदन नगरपालिकेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. नगरसेवकपदाचे स्वप्न पाहणाºया शेकडो उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरले. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला बँकेत स्वतंत्र खाते उघडून दररोज निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. असे असतानाही काही उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर केला नाही. खर्च सादर न करणाºया अनेक उमेदवारांना नगरपालिका प्रशासनामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर बहुतांश उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे खर्च सादर केला. मात्र, ५४ उमेदवारांनी वारंवार सूचना देऊनही निवडणूक खर्च सादर करण्यास टाळाटाळ केली. अशा उमेदवारांना नगरपालिका प्रशासनाने निवडणूक विभागाच्या नियमानुसार खर्च सादर न केल्यामुळे आपणास निवडणूक लढविण्यास अपात्र का ठरवू नये, या आशयाची नोटीस पाठवून आपली बाजू मांडण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, संबंधित उमेदवारांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नियमांनुसार ५४ उमेदवारांना तीन वर्षांकरिता कुठलीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.