जिल्हा योजनेचा ५४ कोटींचा निधी अखर्चित
By Admin | Published: March 10, 2017 12:26 AM2017-03-10T00:26:41+5:302017-03-10T00:27:32+5:30
लातूर : जिल्हा वार्षिक योजनेत अखर्चित निधीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, जवळपास ३२ टक्के निधी अखर्चित राहिला आहे़
लातूर : जिल्हा वार्षिक योजनेत अखर्चित निधीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, जवळपास ३२ टक्के निधी अखर्चित राहिला आहे़ २०० कोटींपैकी जिल्हा नियोजन विभागाने संबंधित यंत्रणेकडे १७० कोटी रूपये वितरित केले असून, त्यापैकी ११६ कोटींचा खर्च संबंधित यंत्रणांनी केला आहे़ ६८ टक्के खर्च आतापर्यंत झाला असून, ३२ टक्के खर्च अद्याप यंत्रणांनी केला नाही़
जिल्हा नियोजन समितीने विविध विकास कामांसाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धशाळा विकास, मत्स्य व्यवसाय विकास, वने व वन्य जीवन, सहकार, मृदा व जलसंधारण, ग्रामीण रोजगार, एकात्मिक ग्रामीण रोजगार, सामान्य शिक्षण, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, लोकवाचनालय, क्रीडा व युवक कल्याण, मागासवर्गीय कल्याण योजना, महिला व बालकल्याण, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, गृहनिर्माण, नगरविकास, लघु पाटबंधारे, ग्रामीण लघु उद्योग, रस्ते विकास, ग्रामीण रस्ते विकास, रस्ते व पूल, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांसाठी २०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले़ त्यापैकी या यंत्रणांना १७० कोटी रूपये वितरित करण्यात आले असून, वर्षभरात या यंत्रणेने ११६ कोटी रूपये खर्च केले आहेत़ उर्वरित ५४ कोटी निधी अखर्चित राहिला आहे़ सहा दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन अखर्चित निधी तत्काळ खर्च करून विकासाच्या योजना राबविण्याच्या सूचना केल्या होत्या़ यापूर्वीच्याही बैठकीत वेळेत निधी खर्च करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या़ तरीही ५४ कोटी रूपयांचा निधी अखर्चित राहिला आहे़ मार्च अखेर हा निधी खर्च न केल्यास इतर विभागाकडे वर्ग करावा लागतो़