गंगापूरातील ५४ गावे रमेश बोरनारेंसाठी ठरली तारणहार; दिनेश परदेशींना ग्रामीण भागातून फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 03:15 PM2024-11-26T15:15:40+5:302024-11-26T15:16:35+5:30
वैजापूर विधानसभा मतदारसंघ, परदेशी यांना ग्रामीण भागात मिळाला नाही थारा
- बाबासाहेब धुमाळ
वैजापूर :वैजापूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे उमेदवार आ. रमेश बोरनारे यांना गंगापूर तालुक्यातील ५४ गावांनी भरभरून साथ दिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाल्याचे दिसून आले. शिवाय रामगिरी महाराजांचा प्रभाव असलेल्या वांजरगाव जिल्हा परिषद गटातून देखील बोरनारे यांना जास्तीचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे त्यांनी उद्धव सेनेचे दिनेश परदेशी यांचा ४२ हजार मतांनी पराभव केला.
वैजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी हे भारतीय जनता पक्ष सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेत दाखल झाले होते. ते पक्षात आल्यानंतर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांत जल्लोष संचारल्याचे दिसून आले. गावागावांत कार्यकर्त्यांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत देखील केले होते. ते नक्की या निवडणुकीत विजयी होतील, असे आडाखे बांधले गेले होते. कारण यापूर्वी दोनदा विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाल्याने या निवडणुकीत त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट देखील होती. परंतु या निवडणुकीत सहानुभूतीचे मतात रुपांतर होऊ शकले नाही. वैजापूर शहर वगळता कुठेही परदेशी यांना मताधिक्य मिळू शकले नाही. मराठा व ओबीसी या समीकरणाचा देखील परदेशी यांना फटका बसला. त्यातच मतदानाच्या दोन दिवस अगोदर परदेशी यांच्या नावाने खोटी पत्रके वाटप करण्यात आली. याचाही काही प्रमाणात फटका त्यांना बसल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे हिंदू, मुस्लिम या जातीय समीकरणाचा फटकाही त्यांना बसला. काही दिवसांपासून गोदाधामचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल झाला होता. दुसरीकडे हिंदू समाजातील अनेक जण रामगिरी महाराज यांच्या पाठीशी होते. रामगिरी महाराज यांनी बोरनारे यांना समर्थन दिल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत होते. त्याचा एकीकडे बोरनारे यांना फायदा झाला तर दुसरीकडे परदेशी यांना फटका बसला. महालगाव सारख्या सर्कलमध्ये सुद्धा परदेशी यांची पिछाडी झाली. दुसरीकडे रमेश बोरनारे यांनी जास्तीचा गाजावाजा न करता संयमाने आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला. वैजापूर विधानसभा मतदारसंघात असलेल्या गंगापूर तालुक्यातील ५४ गावांतून बोरनारे यांना सर्वाधिक लीड मिळाली.
परदेशी यांच्या कार्यकर्त्यांना अति आत्मविश्वास नडला
बोरनारे यांनी तालुक्यात केलेली विकासकामे व शासनाची लाडकी बहीण योजना देखील बोरनारे यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसून आले. बोरनारे यांनी तयार केलेली कार्यकर्त्यांची फळी त्यांना विजयश्री खेचून आणण्यासाठी यशस्वी ठरली. तर दुसरीकडे परदेशी यांच्या कार्यकर्त्यांना अति आत्मविश्वास नडल्याचे दिसून आले.
शिंदे यांनी जनतेची मने जिंकली
गेल्या ५ वर्षांच्या कालावधील आपण अनेक जनहिताची कामे केली. या कामांची पावती मतदारांनी आपणास दिली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेची जिंकलेली मने यामुळे मला विजयश्री मिळाली.
-रमेश बोरनारे
वैजापूर विधानसभा मतदारसंघ : उमेदवारांना मिळालेली मते
उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
रमेश बोरनारे शिंदेसेना १,३३,६२७
डॉ. दिनेश परदेशी उद्धवसेना ९१,९६९
संतोष पठारे बसपा ९८१
किशोर जेजूरकर वंचित बहुजन आघाडी ५,४९५
जे. के. जाधव प्रहार १,१३३
विजय शिनगारे अपक्ष ३७८
एकनाथ जाधव अपक्ष ८,२०५
प्रकाश पारखे अपक्ष ३६८
शिवाजी गायकवाड अपक्ष ४०१
ज्ञानेश्वर घोडके अपक्ष ६१८
नोटा १७१३
एकूण २४३३८१
महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार रमेश बोरनारे हे ४१,६५८ मताधिक्य मिळवून विजयी झाले.