ऑनलाइन फसवणूक झालेल्या ५५ जणांना सायबर पोलिसांमुळे मिळाले ११ लाख ५४ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:02 AM2021-01-02T04:02:17+5:302021-01-02T04:02:17+5:30
औरंगाबाद : विविध आमिषे दाखवून कॉल करणाऱ्या ठगांनी लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक केलेल्या ५५ तक्रारदारांना सायबर पोलिसांनी तब्बल ...
औरंगाबाद : विविध आमिषे दाखवून कॉल करणाऱ्या ठगांनी लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक केलेल्या ५५ तक्रारदारांना सायबर पोलिसांनी तब्बल ११ लाख ५४ हजार ५८१ रुपये परत मिळवून दिले. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत ही रक्कम गुन्हेगारांच्या घशातून ओढून आणण्यात पोलिसांना यश आले.
लॉटरी लागली, झटपट कर्ज मिळवून देतो, स्वस्तात चारचाकी वाहन विक्री करतो, विदेशात नोकरी लावून देतो, एटीएम कार्ड नूतनीकरण करायचे आहे, अशा थापा मारणारे फोन कॉल करून सायबर गुन्हेगार सामान्यांची ऑनलाइन फसवणूक करीत असतात. अशा प्रकारच्या तक्रारी रोज सायबर पोलीस ठाण्याला प्राप्त होतात. ऑनलाइन फसवणूक झाल्यावर जेवढ्या लवकर तक्रारदार सायबर ठाण्यात जाईल, तेवढ्या लवकर त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी पोलिसांना झटपट कारवाई करता येते. सायबर गुन्हेगार लुबाडणूक केलेली रक्कम एका व्हॉलेट (पेटीएम) मधून त्यांच्या विविध व्हॉलेटमध्ये आणि त्याच्या बँक खात्यांत वर्ग करतात. ही रक्कम अन्य खात्यात वर्ग होण्यापूर्वी पोलीस अधिकारी संबंधित कंपनीच्या आणि बँकेच्या नोडल ऑफिसर यांना पत्रव्यवहार करून ती रक्कम गोठवितात. यानंतर ही रक्कम अर्जदाराच्या खात्यात परत पाठवून देणे त्यांना बंधनकारक असते. अशा प्रकारे जानेवारी ते नोव्हेंबरअखेर या कालावधीत सायबर गुन्हेगारांनी ५५ जणांचे ऑनलाइन पळविलेल्या लाखो रुपयांपैकी ११ लाख ५४ हजार ५८१ रुपये परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली.
=================
सायबर पोलीस ठाणे अधिक बळकट करणार
पोलीस आयुक्त म्हणाले की, दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढत आहेत. यामुळे आगामी काळात पोलीस ठाणे स्तरावरील निवडक कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्याचा तपास कसा करावा, याविषयी प्रशिक्षण देण्यात येईल. सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिवाय अन्य महत्त्वाचे सॉफ्टवेअर त्यांना उपलब्ध केले जातील.