नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ५५ टक्के; जॅकवेल, मुख्य जलवाहिन्यांच्या कामांनी घेतली गती
By मुजीब देवणीकर | Published: November 2, 2023 04:00 PM2023-11-02T16:00:15+5:302023-11-02T16:05:01+5:30
शहरात नवीन जलकुंभ उभारण्यासाठी कामगार मिळत नसल्याने कंत्राटदार कंपनीने आंध्र प्रदेश येथून मजूर आणले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शहराची लोकसंख्या २०५० मध्ये किती राहील, हे गृहीत धरून २७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. अनेक अडथळ्यांनंतर योजनेच्या विविध कामांनी आता चांगलीच गती घेतली आहे. आतापर्यंत योजनेचे ५५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. याच गतीने काम सुरू राहिल्यास डिसेंबर २०२४ मध्ये योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत वारंवार याेजनेचा आढावा घेत आहेत. जायकवाडी धरणात जॅकवेल उभारण्यासाठी कॉफरडॅम उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले. पुढील काही महिन्यांत सिमेंटच्या भिंती उभारण्याचे काम सुरू होईल. धरणाच्या पायथ्याशी खडक लागल्याने ब्रेकरच्या साह्याने काम सुरू करण्यात आले. या ठिकाणी ब्लास्टिंगला परवानगी नसल्याने खडक फोडण्यासाठी यंत्रणा वाढविण्यात आली. त्याचप्रमाणे जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. दररोज दोन ते तीन जलवाहिन्यांना वेल्डिंग केली जात होती. आता हे प्रमाण तब्बल ७ पर्यंत नेण्यात आले. त्यामुळे २२ किमीपेक्षा अधिक अंतरावर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. पुढील ८ किमीसाठी पाइपही आणून ठेवण्यात आले. काही ठिकाणी मनपाच्या ७०० आणि १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांचा अडथळा येतोय. किंचितही धक्का लागला तर दोन्ही वारंवार फुटून शहराचा पाणीपुरवठा ठप्प होत असल्याने अत्यंत सावधगिरीने काम करावे लागत असल्याचे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र गोगलोतू यांनी सांगितले.
शहरात १८०० किमीच्या जलवाहिन्या
शहरामध्ये १८०० किमीच्या जलवाहिन्या टाकायच्या आहेत. त्यालाही गती दिली असून, दररोज दोन ते अडीच किमी. जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. नक्षत्रवाडी येथे सहा जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. त्यांतील तीन पूर्ण झाली असून, उर्वरित केंद्रांचे काम जवळपास ६० टक्के पूर्ण झाले.
मनपाचे जलकुंभाकडे लक्ष
नवीन पाणीपुरवठा योजनेत तयार करण्यात आलेले जलकुंभ हस्तांतरण करून घेणे, त्याचा त्वरित वापर सुरू करण्यावर मनपा प्रशासनाने भर दिला आहे. उन्हाळ्यापूर्वी ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण येईल. शहरात अतिरिक्त ७५ एमएलडी पाणी येईल. तूर्त ७०० मिमीची जुनी जलवाहिनी काही दिवस सुरू ठेवण्याचा मानस प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.
११ जलकुंभांची कामे अंतिम टप्प्यात
शहरात नवीन जलकुंभ उभारण्यासाठी कामगार मिळत नसल्याने कंत्राटदार कंपनीने आंध्र प्रदेश येथून मजूर आणले आहेत. ११ जलकुंभांची कामे अंतिम टप्प्यात असून, आंध्र प्रदेशातील मजुरांकडून रखडलेल्या जलकुंभांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी नमूद केले की, ४० मजुरांची पहिली तुकडी दाखल झाली आहे. त्यामुळे तीन जलकुंभांची कामे लगेचच सुरू होतील.