गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ८ हजार प्रेक्षक क्षमतेचे ५६ कोटींचे पॅव्हेलियन उभे राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 06:41 PM2024-10-14T18:41:03+5:302024-10-14T18:42:28+5:30

स्टेडियमवर खेळाडूंसाठी चेजिंग रूम, पंचांसाठी वेगळी खोली, समालोचकांसाठी वेगळा कक्ष देखील असणार आहे

56 crores pavilion with a capacity of 8000 spectators will be erected at the Garware Cricket Stadium | गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ८ हजार प्रेक्षक क्षमतेचे ५६ कोटींचे पॅव्हेलियन उभे राहणार

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ८ हजार प्रेक्षक क्षमतेचे ५६ कोटींचे पॅव्हेलियन उभे राहणार

छत्रपती संभाजीनगर : गरवारे स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे सामने व्हावेत, यादृष्टीने महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी अद्ययावत पॅव्हेलियन चार टप्प्यांत उभारण्यात येईल. त्यासाठी ५६ कोटींची तरतूद करण्यात आली असून, ८ हजार प्रेक्षक बसतील, अशी सोय केली जाणार आहे. स्टेडियमवर खेळाडूंसाठी चेजिंग रूम, पंचांसाठी वेगळी खोली, समालोचकांसाठी वेगळा कक्ष, अशा अनेक सोयी-सुविधांचा आराखडा तयार करून निविदा काढली जाणार असल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.

गरवारे स्टेडियमकडे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले. त्यामुळे या ठिकाणी ‘लोकमत’च्या अपना प्रिमियर लीगसह काही मोजक्याच स्पर्धा होत होत्या. प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्टेडियमवर अगोदर पाण्याची व्यवस्था केली. ड्रेनेजचे पाणी पिण्यायोग्य शुद्ध करून लॉनसाठी वापरण्यात येते. त्यामुळे आता बाराही महिने ग्राऊंड हिरवेगार दिसते. राज्य पातळीवरील काही स्पर्धाही या ठिकाणी होत आहेत. ग्राऊंडवर सतत स्पर्धांसाठी बुकिंगही मिळत आहे. ग्राऊंडच्या शेजारील कलाग्रामची जागा मिळावी, यासाठी मनपाकडून दीड वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्ती नसल्याने मनपाचे हे स्वप्न पूर्ण होत नाही.

निधीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न
पॅव्हेलियनसाठी ५६ कोटींची तरतूद केली आहे. लवकरच आराखडा तयार होईल. त्यानंतर निविदा काढली जाईल. ८ हजार प्रेक्षक बसतील, असे हे अद्ययावत पॅव्हेलियन असेल. या सोबतच विविध सोयी-सुविधांची उभारणी करण्यात येईल. हा निधी मनपाच्या तिजोरीतून खर्च केला जाणार आहे. भविष्यात शासनाकडून काही निधी मिळाला, तर अधिक चांगले. निधीसाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासकांनी सांगितले.

शहराचे नाव उंचावेल
शहरात एक तरी मोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम झाले, तर नाव उंचावेल. विविध देशांतील संघ शहरात खेळण्यासाठी येतील. मराठवाड्यातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल. शहरातही अनेक आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील. या स्टेडियमच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना काम मिळेल, अशी अपेक्षा प्रशासकांनी व्यक्त केली.

Web Title: 56 crores pavilion with a capacity of 8000 spectators will be erected at the Garware Cricket Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.