५७ प्रवासी बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:10 AM2017-11-01T00:10:49+5:302017-11-01T00:10:53+5:30
हस्ता खांडीत मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास खड्ड्यांमुळे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला अडकल्याने ५७ प्रवासी बालंबाल बचावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नड/वासडी : कन्नड ते सिल्लोड रस्त्यावरील हस्ता खांडीत मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास खड्ड्यांमुळे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला अडकल्याने ५७ प्रवासी बालंबाल बचावले. नसता मोठा अनर्थ घडला असता. बसमधील लहान मुलांसह चौघांना किरकोळ मार लागला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोडहून सकाळी ८.१५ वाजता एमएच-२० बीएल- १५०८ ही बस प्रवासी घेऊन कन्नडकडे निघाली होती. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास हस्ता खांडीत पिराच्या वरच्या वळणावर खड्ड्यात आदळून ती बंद पडली.
यामुळे स्टेअरिंग जाम होऊन बस थेट रस्त्याच्या खाली गेली. मात्र, सुदैवाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या सागवान झाडाला बस अडकली. नसता मोठा अनर्थ घडला असता. या घटनेत बसमधील दोन लहान मुलांसह चौघे किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच कन्नड आगाराचे प्रमुख गित्ते, सहायक कार्यशाळा अधीक्षक एच.डी. वीर, वाहतूक नियंत्रक बैरागी यांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांना दोन बसधून कन्नडला सोडले.
या बस अपघातात बसचे जवळपास २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे वीर यांनी सांगितले. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्टेअरिंग जाम होऊन बस रस्त्याच्या खाली गेल्याचे प्रवाशांनी सांगितले, तर चालकाच्या म्हणण्यानुसार समोरच्या वाहनाने हूल दिल्याने बस रस्ता सोडून खाली गेली.