श्रीक्षेत्र माहूरगडावर ५८ सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:51 AM2017-09-11T00:51:49+5:302017-09-11T00:51:49+5:30
साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे शारदीय नवरात्र महोत्सवाची माहूरगडावर तयारी सुरू झाली आहे़ संस्थानच्या वतीने स्वच्छता आणि सुरक्षेवर अधिक भर देण्यात येत असून संपूर्ण श्रीक्षेत्र माहूरगडावर तब्बल ५८ सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे शारदीय नवरात्र महोत्सवाची माहूरगडावर तयारी सुरू झाली आहे़ संस्थानच्या वतीने स्वच्छता आणि सुरक्षेवर अधिक भर देण्यात येत असून संपूर्ण श्रीक्षेत्र माहूरगडावर तब्बल ५८ सीसीटीव्हीची करडी नजर राहणार आहे़
नवरात्रोत्सव काळात लाखो भक्त आई रेणुकादेवीच्या दर्शनासाठी येतात़ या काळात पहाटे पाच ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते़ दरम्यान, २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी संस्थानच्या वतीने युद्धपातळीवर तयारी सुरु आहे़ उत्सवात पारंपरिक पूजाअर्चा व सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत़ यामध्ये ललित पंचमीनिमित्त २४ रोजी प्रख्यात गायक पं. सुधीर फडके यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल़
संस्थानतर्फे मंदिर रंगरंगोटी, विद्युत व्यवस्थेचे सुसूत्रीकरण, भाविकांची सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे संस्थानचे विश्वस्त समीर भोपी यांनी सांगितले़ सुरक्षेबरोबरच भाविकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे़ यासाठी विविध आरोग्य पथके, रूग्णवाहिका आणि भाविकांना पिण्यासाठी शुद्ध व थंड पाण्याची मुबलक प्रमाणात व्यवस्था केली जाणार आहे़ गडावरील स्वच्छतेसाठी ११ नियमित कर्मचारी असून उत्सवकाळासाठी तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेनुसार सफाई कर्मचारांची नियुक्ती केली जाणार आहे़ अग्निशमन दलास उत्सव काळात पाचारण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अखंडित वीजपुरवठ्यासाठी जादा क्षमतेचे जनरेटर खरेदी केले आहे. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, संस्थानचे पदसिद्ध सचिव तथा उपविभागीय अधिकारी नरेंद्र देशमुख, संस्थानचे पदसिद्ध उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, संस्थानचे पदसिद्ध कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे़
यावेळी विश्वस्त संजय काण्णव, चंद्रकांत भोपी, गाभारा पुजारी शुभम भोपी, मानकरी अश्विन भोपी, व्यवस्थापक योगेश साबळे, मुख्य सुरक्षा अधिकारी सुभेदार, प्रकाश सरोदे यांची उपस्थिती होती.