उद्घाटनापूर्वीच चिकलठाणा सामान्य रुग्णालयाची ५८ लाखांची औषधी कालबाह्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 12:09 PM2017-11-21T12:09:28+5:302017-11-21T12:22:13+5:30
चिकलठाणा येथील २०० खाटांचे सामान्य रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच तब्बल ५८ लाख रुपयांचा औषधी खरेदी घोटाळा उघडकीस आला आहे.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : चिकलठाणा येथील २०० खाटांचे सामान्य रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच तब्बल ५८ लाख रुपयांचा औषधी खरेदी घोटाळा उघडकीस आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन वर्षांपूर्वीच कोट्यवधी रुपयांची औषधांची खरेदी करून ठेवली आहे. त्यातील ५८ लाख रुपयांची औषधी एक्स्पायर झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शासनाच्या भांडार पडताळणी पथकाने हे औषध खरेदीचा घोटाळा उघडकीस आणला असून, दोषी अधिकारी व कर्मचा-यांवर त्वरित जबाबदारी निश्चित करून शासनाला अनुपालन अहवाल सादर करावा, अशी शिफारस आरोग्य उपसंचालकांना केली आहे.
घाटी रुग्णालयावरील रुग्णांचा ताण कमी व्हावा यादृष्टीने काँग्रेस आघाडी सरकारने २०११ मध्ये चिकलठाणा येथे २०० खटांचे रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिली. शासन एवढ्यावरच न थांबता रुग्णालयाच्या बांधकामासाठी, साधनसामग्रीच्या खरेदीसाठीही भरीव आर्थिक तरतूद केली. एकूण ३८ कोटी रुपये खर्च करून चिकलठाण्यात आज भव्य-दिव्य रुग्णालयाची इमारत उभी आहे. मागील दोन वर्षांपासून विद्युत विभागाची कामे, नळजोडणी, कर्मचारी भरती, अद्ययावत यंत्र सामग्री खरदी आदी कारणे सांगून लोकार्पण टाळण्यात येत आहे. रुग्णालयाचा संपूर्ण कारभार जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत आतापर्यंत सुरू आहे.
जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी सामान्य रुग्णालयाचे बांधकाम सुरू असतानाच कोट्यवधी रुपयांच्या औषधांची खरेदी करून ठेवली. रुग्णालयच सुरू नसताना ही औषधी का आणि कशासाठी खरेदी केली, हा प्रश्न अनुत्तरित आहे. जेवढी औषधी खरेदी केली होती त्यातील ५८ लाख ३८ हजार ६४७ रुपयांची औषधी एक्स्पायर झाली आहे. ही सर्व औषधी खोल खड्ड्यात नेऊन टाकावी लागणार आहे. शासनाच्या भांडार पडताळणी अधिका-यांच्या पथकाने सामान्य रुग्णालयाच्या भांडार विभागाची चौकशी केली असता हे विदारक सत्य समोर आले. पथकाने त्वरित संपूर्ण औषधीचा पंचनाम केला. एक्स्पायर झालेली औषधी त्वरित बाजूला करण्यात आली.
कागदपत्रांची लपवाछपवी
भांडार पडताळणी पथकाने जेव्हा औषध खरेदी घोटाळ्याची नियमानुसार तपासणी सुरू केली तेव्हा जिल्हा सामान्य चिकित्सक कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी एकही कागद उपलब्ध करून दिला नाही. संपूर्ण रेकॉर्ड लपवून ठेवण्यात आले.
दोषींवर जबाबदारी निश्चित करा
भांडार पडताळणी अधिका-यांनी १ नोव्हेंबर रोजी आरोग्य उपसंचालकांना पाठविलेल्या सविस्तर अहवालात नमूद केले आहे की, या गंभीर प्रकरणात दोषींवर अगोदर जबाबदारी निश्चित करावी. शासनाला कोट्यवधींचा चुना लावणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करावी याचा अनुपालन अहवाल आमच्या कार्यालयास सादर करावा, असेही अहवालात नमूद केले आहे.
टक्केवारीसाठी कोट्यवधींची खरेदी
चिकलठाणा रुग्णालयाच्या नावावर करण्यात आलेली खरेदी नियमानुसार झाली किंवा नाही, यावरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकाचे उल्लंघन झाल्याचा दाट संशय भांडार पथकाने उपस्थित केला आहे. मोठ्या कंपन्यांकडून मोठी टक्केवारी घेण्यासाठी हा सर्व खटाटोप करण्यात आल्याचेही समोर येत आहे.