गणेशोत्सवात ५८ वर्षांपासून पंगती, अन्नदात्यांची ॲडव्हान्स बुकिंग; दररोज जेवतात ३ हजार लोक
By प्रशांत तेलवाडकर | Published: September 25, 2023 01:30 PM2023-09-25T13:30:53+5:302023-09-25T13:40:19+5:30
एवढेच नव्हे, तर येथील अन्नदाते मागील ३० वर्षांपासून ठरलेले आहेत. ते आगाऊ नोंदणी करून आपली रक्कम जमा करतात.
छत्रपती संभाजीनगर : शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिर ट्रस्टच्यावतीने गणेशोत्सवाच्या काळात मागील ५८ वर्षांपासून अन्नदान केले जाते. विशेष म्हणजे, दररोज ३ हजार लोक येथे रस्त्यावर पंगतीमध्ये बसतात व महाप्रसादाचा लाभ घेतात. एवढेच नव्हे, तर येथील अन्नदाते मागील ३० वर्षांपासून ठरलेले आहेत. ते आगाऊ नोंदणी करून आपली रक्कम जमा करतात. अन्नदानाचे सातत्य टिकविणारे छत्रपती संभाजीनगरमधील हे एकमेव गणेश मंदिर ठरले आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा या शहरात येत त्यावेळी ते पहिले या संस्थान गणपतीचे दर्शन घेत व नंतर आपल्या कामाला सुरुवात करीत. आजही शहरातील जयंती, उत्सवानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रा, मिरवणुकीची सुरुवात याच गणपतीची आरती करून केली जाते. हे ग्रामदैवत ३५० वर्षे जुने आहे. १९६५ साली मंदिरावर विश्वस्त मंडळ नेमण्यात आले. तेव्हापासून मंडळ या मंदिराची देखभाल करीत आहे. तेव्हापासूनच गणेशोत्सवातील ८ दिवस येथे अन्नदान करण्यात येते. तेव्हा बजरंगलाल शर्मा, लक्ष्मण शिंदे आदी पदाधिकाऱ्यांनी पंगतीची सुरुवात केली होती. ती परंपरा आजतगाजत सुरू आहे.
राजाबाजार रस्ता दुपारी ३ ते ४ या वेळेत बंद केला जातो. कारण, येथे रस्त्यावरच पंगती बसतात. लहानापासून ज्येष्ठांमध्ये कोणीही न लाजता येथे रस्त्यावर पंगतीत बसून जेवतात. पूर्वी औरंगपुऱ्यातील नाथ मंदिरात नाथषष्ठीला रस्त्यावर पंगती बसत असत. मात्र, मागील २० वर्षांपूर्वी ही रस्त्यावरील पंगतीची प्रथा बंद पडली व आता मंदिरातच पंगती बसविल्या जातात. पंगतीच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष संतोष चिचाणी, नंदकुमार घोडेले, प्रफुल्ल मालाणी, अनिल चव्हाण, सुनील अजमेरा, कन्हैयालाल शहा, जुगलकिशोर वर्मा, जयेश पुरवार, डॉ. प्रशांत शिंदे, मनोज पराती हे परिश्रम घेत आहेत.
५० वर्षांपासून रमेश घोडेले करतात भंडाऱ्याचे नियोजन
अन्नदानासाठी दररोज तांदळाची खिचडी, पुलाव, बुंदी, पुरी केली जाते. गणेशोत्सवातील पहिला व शेवटचा दिवस वगळता ८ दिवस पंगती वाढल्या जातात. या भंडाऱ्याचे संपूर्ण नियोजन एकहाती असून मागील ५० वर्षांपासून रमेश घोडेले हे नियोजन करीत आहेत. सामान आणण्यापासून ते पंगती वाढण्यापासून भंडाऱ्याचे सर्व नियोजन यशस्वी होत आहे.