८१ जागांसाठी ५८१ उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:20 AM2017-09-28T00:20:02+5:302017-09-28T00:20:02+5:30
महापालिकेच्या ८१ जागांसाठी ५८१ उमेदवार रिंगणात उरले असून उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी बुधवारी ३१२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता ८१ जागांसाठी ५८१ उमेदवारांमध्ये लढत होणार असून तब्बल पाचशे उमेदवारांना निकालानंतर पराभवाचा सामना करावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या ८१ जागांसाठी ५८१ उमेदवार रिंगणात उरले असून उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम दिवशी बुधवारी ३१२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता ८१ जागांसाठी ५८१ उमेदवारांमध्ये लढत होणार असून तब्बल पाचशे उमेदवारांना निकालानंतर पराभवाचा सामना करावा लागणार आहे.
महापालिका निवडणूक रणधुमाळीत २० प्रभागातील ८१ वॉर्डांसाठी ८९३ उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. बुधवार हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत ७ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ३१२ उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. आता ८१ जागांसाठी ५८१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. पक्षासह अपक्ष उमेदवारांना २८ सप्टेंबर रोजी उमेदवारी चिन्ह दिले जाणार आहेत. त्यानंतर खºया अर्थाने प्रचाराला प्रारंभ होईल.
बुधवारी प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी केली. त्यात काही प्रमाणात यश आले. हनुमानगड प्रभागातून अविनाश कदम यांनी उमेदवारी मागे घेतली. भाजपाकडून भाग्यनगर प्रभागात इच्छुक असलेल्या माजी महापौर अजयसिंह बिसेन यांनीही बुधवारी आपली उमेदवारी मागे घेतली. त्याचबरोबर बुधवारी विजय गंभीरे, राजू सोनसळे, व्यंकटेश जिंदम, ललिता कुंभार, अब्दुल गफार, मो. हबीब, पुष्पाताई शर्मा, शीतल वैद्य, विकास गजभारे आदींनी उमेदवारी मागे घेतली. नवीन नांदेडातील वसरणी आणि सिडको प्रभागात विलास काळे, देवानंद जाजू, विजया गोडघासे तसेच वैशाली लांडगे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, एमआयएम, बसपा, समाजवादी पार्टी, भारिप-बहुजन महासंघ आणि अपक्षांचे आव्हान मिळणार आहे. त्यातही या निवडणुकीत खरी लढत काँग्रेस आणि भाजपामध्येच होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने या निवडणुकीत उमेदवार दिले असले तरीही यातील बहुतांश उमेदवार नवखे आहेत. त्यात प्रभागरचनेचा विस्तारही मोठा असल्याने उमेदवारांची दमछाक होणार आहे. त्यामुळे काही प्रमुख पक्षांचे उमेदवारही आजघडीला लढतीबाहेर दिसत आहेत. जुन्या नांदेडात काही प्रभागात काँग्रेसला थेट एमआयएमकडून आव्हान आहे. या निवडणुकीत एमआयएमने बसपासोबत आघाडी केली आहे. ही आघाडी कितपत उपयुक्त ठरेल, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
मनपा निवडणुकीत भाजपाने बहुजन विकास आघाडीला सोबत घेतले आहे. दलित नेते सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला भाजपाने पाच ठिकाणी जागा दिल्या आहेत. या जागा भाजपाच्याच कमळ या चिन्हावर लढवल्या जात आहेत.
प्रचारादरम्यान काँग्रेस, भाजपा, सेना, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनाही बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. ऐनवेळी तिकीट न मिळाल्यामुळे दुसºया पक्षाची उमेदवारी घेवून रिंगणात उतरलेले बंडखोर कितपत प्रभावी ठरतात यावरही काही प्रभागातील निकाल ठरणार आहेत.
२८ सप्टेंबर रोजी निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहेत.
राष्ट्रीय, राज्यस्तरीय, प्रादेशिक पक्षाने आपला प्रचार सुरू केला असला तरी अपक्ष उमेदवारांना मात्र गुरुवारपासून निशाणी मिळाल्यानंतरच प्रचाराला प्रारंभ करता येणार आहे.
प्रचाराच्या रणधुमाळीत आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैºया झडणार आहेत. विकासाचा अजेंडाही निवडणूक प्रचारात पुढे येईल.