छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ लाख जनधन खात्यात ५८७ कोटींच्या ठेवी
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 23, 2024 11:49 AM2024-06-23T11:49:14+5:302024-06-23T11:50:02+5:30
सरकारी योजनांची रक्कम थेट जनधन खात्यात जमा होत असल्याने व बँकेत खाते उघडल्यास त्याचे लाभ लक्षात येऊ लागल्याने जनधन खाते उघडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे.
छत्रपती संभाजीनगर : जनधन योजनेचा उद्देश गरीब आणि वंचित जनतेपर्यंत आर्थिक सेवेचा लाभ पोहोचविणे. यासाठी गरिबांचे बँक खाते उघडणे, त्यांना बँकिंग सुविधा प्रदान करणे आहे. तळागळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. याची फलनिष्पत्ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर १४ लाख खातेदारांच्या खात्यात आजघडीला ५८७ कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
मागील तीन वर्षांत वाढले १ लाख नवीन खातेदार
सरकारी योजनांची रक्कम थेट जनधन खात्यात जमा होत असल्याने व बँकेत खाते उघडल्यास त्याचे लाभ लक्षात येऊ लागल्याने जनधन खाते उघडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. मागील तीन वर्षात १ लाख ४ हजार नवीन खात्यांची भर पडली आहे.
वर्षभरात वाढल्या १४२ कोटींच्या ठेवी
मार्च २०२३ या आर्थिक वर्षात १३ लाख ५४ हजार जनधन खातेदारांची नोंद होती. ४४५ कोटी रुपये जमा झाले होते. यात मार्च २०२४ मध्ये १४ लाख ६३ हजार खात्यात ५८७ कोटीच्या ठेवी जमा झाल्या आहेत. वर्षभरात १४२ कोटींच्या ठेवींची भर पडली, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली.
बँकामधील जनधन खाते व त्यातील ठेवींचा वाढता आलेख
वर्ष--------- खाते---------- ठेवींची रक्कम
मार्च २०२२ -- १३ लाख ३९ हजार---३९१ कोटी
मार्च २०२३---१३ लाख ५४ हजार--- ४४५ कोटी
मार्च २०२४--- १४ लाख ६३ हजार--- ५८७ कोटी
दीड लाख खात्यात शून्य रक्कम
एकीकडे १४ लाखांपेक्षा अधिक जनधन खात्यात ५८७ कोटी ठेवी जमा झालेल्या असताना. १ लाख ४३ हजार खाती अशी आहेत ज्यात आजही शून्य टक्के रक्कम आहे. मागील आर्थिक वर्षात व चालू आर्थिक वर्षात खाते तेवढेच व रक्कमही शून्य आहे, यात काहीच बदल झाला नाही.
जनधन खाते कोण उघडू शकते?
१) आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना खाते उघडता येते
२) जे लोक अद्यापपर्यंत बँकिंग प्रणालीशी जोडलेले नाहीत.
३) खिशात पैसे नसले तरी खाते उघडता येते.
४) खात्यात किमान शिल्लक न ठेवल्यास कोणताही दंड भरावा लागत नाही.