उमेद अभियानांतर्गत बँक करस्पाँडन्स सखींनी केला चार महिन्यांत ६ कोटींचा व्यवहार
By विजय सरवदे | Published: August 25, 2023 01:02 PM2023-08-25T13:02:56+5:302023-08-25T13:03:44+5:30
जागतिक महिला बँकेने ग्रामीण भागात बँकिंग सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने क्रियाशील महिला बचत गटांतील शिक्षित सदस्यांतून ‘बीसी सखी’ ही योजना राबविण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याची निवड केली आहे
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने निवडलेल्या बचत गटाच्या बीसी (बँक करस्पाँडन्स) सखींनी यशस्वीपणे बँकेचा व्यवहार पूर्ण करून ग्रामीण भागातील बँक खातेदारांना मदत केली आहे. जिल्ह्यातील ८४ बीसी सखींनी मागील चार महिन्यांत जवळपास ६ कोटी रुपयांचा बँकव्यवहार पूर्ण केला असून, त्यांना चांगला मोबदलाही प्राप्त झाला आहे. जागतिक महिला बँकेने ग्रामीण भागात बँकिंग सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने क्रियाशील महिला बचत गटांतील शिक्षित सदस्यांतून ‘बीसी सखी’ ही योजना राबविण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याची निवड केली असून, मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात ८१ बीसी सखी कार्यरत होत्या. एप्रिलमध्ये आणखी त्यात तिघींची यामध्ये भर पडली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे (डीआरडीए) १६ हजार २९५ बचत गट कार्यरत आहेत. या बचत गटांचे लहान-मोठे उद्योग व्यवसाय असून, त्यांना बँकेमार्फत अर्थसाहाय्य करण्यात येत आहे. तथापि, दैनंदिन कामकाज सोडून अनेक बचत गटांच्या महिलांना किंवा ग्रामस्थांना बँकेच्या व्यवहारासाठी वेळ मिळत नाही. त्यांना बीसी सखींच्या माध्यमातून बँकेची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या ‘डीआरडीए’ने बीसी सखीसाठी ५१० सुशिक्षित महिलांची निवड करून ठेवली आहे. गरजेनुसार बँकांकडून मागणी आल्यास निवड केलेल्या महिलांची नावे त्यांच्याकडे पाठविली जातात. त्यानंतर संबंधित महिलेकडे असलेल्या लॅपटॉप, संगणक, थंब इम्प्रेशन मशीन, स्वतंत्र छोटीशी खोली आदी पायाभूत सुविधा बघून बँका त्या महिलेची बीसी सखी म्हणून अधिकृतपणे नेमणूक करतात. जिल्ह्यात भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि इंडिया पोस्ट या पाच बँकांकडे बीसी सखी बँकेचे व्यवहार करतात. बँकेच्या व्यवहारानुसार या सखींना कमिशन मिळते.
‘सखी मिलाप’ उत्साहात
चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि जागतिक महिला बँकेच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘सखी मिलाप’ कार्यक्रम झाला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील ८४ सखी उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. यात बीसी सखींनी बँकेचे व्यवहार, मिळणारा मोबदला व कुटुंबाची झालेली प्रगती यासंबंधी अनुभव कथन केले.