जायकवाडी धरणाचे ६ दरवाजे उघडून विसर्ग, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 12:59 PM2024-09-09T12:59:26+5:302024-09-09T13:06:12+5:30

यापूर्वी २०२२ मध्ये नाथसागर धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता.

6 gates of Jayakwadi dam opens, alert warning to Godavari riverside villages | जायकवाडी धरणाचे ६ दरवाजे उघडून विसर्ग, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी धरणाचे ६ दरवाजे उघडून विसर्ग, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

- दादासाहेब गलांडे
पैठण :
येथील जायकवाडी धरणातीलपाणीसाठा रविवारी सायंकाळी ६ वाजता ९६.३७ टक्के झाला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ६ वाजता जलसाठा ९७.३७ टक्क्यांवर पोहचला. धरणात ९८ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली होती. त्यानुसार आज दुपारी १२ ते  १ वाजेच्या दरम्यान धरणाचे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून गोदावरी नदीत ३१४४ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे.

जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रासह नाशिक परिसरातून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. असे असले तरी धरणातील पाणीसाठा रविवारी सायंकाळी ६ वाजता १५२१.३९ फूट (९६.३७ टक्के) झाला. धरणाची क्षमता १५२२ फूट आहे. धरणात रविवारी २०९२.१२४ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा होता. धरणात पाण्याची १८ हजार ७२ क्युसेकने आवक होत असून उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणासाठी ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, आज सकाळी ६ वाजता  जलसाठा ९७.३७ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर पाणीसाठा ९८ टक्के झाल्यानंतर दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान नाथसागर धरणाचे गेट क्र. १०, २७, १८, १९, १६ आणि २१ असे एकूण सहा दरवाजे ०. ५ फुट उंचीने उघडून ३ हजार १४४ क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांतील गोदावरी नदी काठच्या गावकऱ्यांना सतर्क राहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. यापूर्वी २०२२ मध्ये नाथसागर धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला होता.

Web Title: 6 gates of Jayakwadi dam opens, alert warning to Godavari riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.