संकुलात ६ शासकीय अधिकारी-कर्मचारी; तरीही बँक खात्याची जबाबदारी कंत्राटी क्लर्ककडे कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 20:00 IST2025-01-02T19:54:17+5:302025-01-02T20:00:03+5:30
क्रीडा घोटाळा: पोलिस तपासात गंभीर प्रश्न उपस्थित; पालकमंत्री समितीचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त उपाध्यक्ष, तरी संकुलाचा निधी वाऱ्यावर

संकुलात ६ शासकीय अधिकारी-कर्मचारी; तरीही बँक खात्याची जबाबदारी कंत्राटी क्लर्ककडे कशी?
छत्रपती संभाजीनगर : अध्यक्षपदी पालकमंत्री, उपाध्यक्षपदी विभागीय आयुक्त, सदस्यपदी उपसंचालक असलेल्या क्रीडा संकुल समितीच्या कोट्यवधींचा निधी असलेल्या बँक खात्याचे बँक आयडी, पासवर्ड हर्षकुमार क्षीरसागरकडे होते. विशेष म्हणजे येथे ६ शासकीय कर्मचारी, अधिकारी असताना क्षीरसागरकडेच आयडी, पासवर्डसह बँक व्यवहाराची जबाबदारी कोणी दिली? त्याने कॅशबुक नोंदीत फेरफार केली; परंतु त्या नोंदी तपासून अंतिम सही उपसंचालक करतात, तर तेव्हाच याची शहानिशा का नाही झाली, असे गंभीर मुद्दे पोलिस तपासात उघडकीस आले आहेत. त्यामुळे या मास्टर प्लानचे दुसरे कोणी सूत्रधार असल्याचा संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
२१ डिसेंबर रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात, समितीच्या ५९.६२ कोटींच्या निधीपैकी २१.५९ कोटींचा निधी हर्षकुमारने हडपला. २०२२ मध्ये दिशा फॅसिलिताज या कंपनीकडून क्षीरसागरची संकुलाच्या दैनंदिन कामकाजासाठी नियुक्ती झाली. विशेष म्हणजे, वर्षभरातच कंपनीमध्ये बदल करत वेव मल्टि सर्व्हिसेसकडे कंत्राट देण्यात आले व त्यांनी देखील क्षीरसागरलाच या कामासाठी नियुक्त केले. बुधवारी हर्षकुमारला अटक करण्यात आली. त्यानंतरही प्राथमिक चौकशीत हा सर्व प्रकार उपसंचालक संजय सबनीस यांच्या सांगण्यावरूनच केल्याच्या ‘लेटर कॉन्स्पिरन्सी’वर तो ठाम होता.
तरीही हर्षकुमारकडेच जबाबदारी का?
-विभागीय क्रीडा संकुलाच्या उपसंचालकपदाचा सबनीस यांच्याकडे प्रभारी पदभार होता. ते कामकाजानुसार ये-जा करत होते. त्याव्यतिरिक्त येथे कायमस्वरूपी शासनाकडून दोन वरिष्ठ लिपिक, एक क्रीडा अधिकारी, एक मुख्य लिपिक, दोन कनिष्ठ लिपिक आहेत.
-तरीही अत्यंत उच्चपदस्थ व्यक्ती समितीवर असताना कोट्यवधींच्या निधीची जबाबदारी अचानक २०२२ मध्ये अवघ्या २१ वर्षीय कंत्राटी कर्मचारी क्षीरसागरकडे देण्यात आली.
-विशेष म्हणजे बुधवारी न्यायालयात सरकारी पक्षाने बाजू मांडताना क्षीरसागरकडे समितीच्या बँक खात्याचे आयडी, पासवर्डदेखील असल्याचे सांगितले. ते कोणाकडून मिळाले, याचा तपास पोलिस करत आहेत.
हैदराबादमध्ये आई-वडिलांपासून झाला वेगळा
मालेगावला मामाची भेट घेतल्यानंतर हर्षकुमार आई-वडिलांसह हैदराबादला गेला होता. तेथून आई-वडिलांना मुर्डेश्वरला पाठवत तो रेल्वेने दिल्लीला गेला. तेथून तो कायदेशीर सल्लामसलत करत होता. तिथून पुढे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.