रिलायन्स स्मार्ट पॉइंटमधील कर्मचाऱ्यांनीच ६ लाखांचा किराणा माल गायब केला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 07:26 PM2024-08-23T19:26:48+5:302024-08-23T19:27:03+5:30
चोरी सीसीटीव्ही कैद झाली असून ६ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
वाळूज महानगर : बजाजनगर-वडगाव परिसरातील रिलायन्स स्मार्ट पाॅइंट या किराणा शॉपीत काम करणाऱ्या ६ कर्मचाऱ्यांनी शॉपीतील ६ लाखांचा किराणा माल गायब केला आहे. या फसवणूक प्रकरणी ६ कर्मचाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिलायन्स रिटेल प्रा.लि. मुंबईचे बजाजनगरातील प्लॉट क्रमांक ४२ मध्ये रिलायन्स स्मार्ट पाॅइंट आहे. दर तीन महिन्यांनी कंपनीतर्फे स्मार्ट पाॅइंटमधील सामानांची तपासणी व ऑडिट केले जाते. ५ ऑगस्टला कंपनीच्या जावेद शेख, संदीप गाडेकर व जया देशमुख या मार्केटिंग अधिकाऱ्यांना विक्री झालेला किराणा माल व शिल्लक राहिलेल्या मालामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली. या तफावतीनंतर या शॉपीतील व्यवस्थापक अमोल फुके व इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. मात्र, येथील एक कामगार ऋषीकेश जवंजाळ यांच्याकडे विचारणा केली असता त्याने या शॉपीमध्ये काम करणाऱ्या ५ कर्मचारी तसेच पूर्वी या शॉपीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने किराणा माल पैसे न देता वाहनातून घेऊन गेल्याची माहिती दिली.
चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दरम्यान, येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करताना रात्री ८.३० ते ९.४५ वाजेच्या सुमारास या शॉपीमध्ये काम करणारे ६ कर्मचारी शॉपीतील किराणा सामान ट्रॉलीमध्ये भरुन तसेच काऊंटरवर बिलाचे पैसे जमा न करता घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. शॉपीतील चोरी केलेला किराणा सामान चारचाकी वाहनातून या कर्मचाऱ्यांनी नेले होते. त्यांनी ६ लाख १९ हजार २४९ रुपयांचा किराणा माल लंपास केल्याचे कंपनीचे मार्केटिंग व्यवस्थापक जावेद शेख यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन अमोल आत्माराम फुके (रा.जटवाडा), पंकज खंडागळे (रा.नारळीबाग), संदीप धांडगे (रा. निसर्ग कॉलनी, भावसिंगपुरा), अल्तमश अब्दुल शेख (रा. इब्राहिम शहा कॉलनी), ऋषीकेश गजानन जवंजाळ (रा. माऊलीनगर, कमळापूर) व सय्यद रहेमान अफान (रा. बेगमपुरा) या ६ कर्मचाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक काकड हे करीत आहेत.