सौभाग्याचं लेणं! संक्रांतीसाठी औरंगाबादेत आल्या ६ ट्रक भरून बांगड्या
By प्रशांत तेलवाडकर | Published: January 10, 2023 08:00 PM2023-01-10T20:00:12+5:302023-01-10T20:00:49+5:30
महिला हिरव्या, लाल रंगाच्या बांगड्या खरेदी करीत आहे. मात्र, पिवळ्या रंगाची बांगडीला हातही लावत नाही.
औरंगाबाद : वर्षातील पहिला संक्रांत हा खास महिलांचा सण... सौभाग्याचं लेणं म्हणून प्रत्येक महिला नवीन बांगड्या खरेदी करतातच. यासाठी उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून चक्क ६ ट्रक बांगड्या (अडीच लाख डझन) शहरात आल्या आहेत. मात्र, महिला बांगड्या खरेदीसाठी येतात, त्यात ‘पिवळ्या’ रंगाची बांगडी नको गं बाई, असे म्हणत आहेत.
महिला का पिवळ्या बांगड्यांना हात लावेनात?
महिला हिरव्या, लाल रंगाच्या बांगड्या खरेदी करीत आहे. मात्र, पिवळ्या रंगाची बांगडीला हातही लावत नाही. कारण यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आहे, असे महिला सांगत असल्याचे बांगड्या विक्रेत्यांनी सांगितले.
चायना पॉलिश बांगड्या सुपरहिट
काचेच्या बांगड्या फिरोजाबादमध्ये तयार केल्या जातात. तेथील उद्योजकांनी चीनमधून मशिन आणल्या आहेत. काचेच्या बांगड्यावर चमक येण्यासाठी या मशिनमध्ये ठेवल्या जातात. त्यावर ॲटोमॅटिक स्प्रे मारला जातो. यामुळे बांगड्या पूर्वीपेक्षा जास्त चमकदार, पॉलिश केल्यासारख्या दिसतात. याच ‘चायना पॉलिश’ बांगड्या सुपरहिट ठरत आहेत.
प्लास्टीक बांगडी मुंबई, तर मेटल दिल्ली, कोलकाता
काचेच्या बांगड्या फिरोजाबादहून येतात, पण प्लास्टीकच्या बांगड्या मुंबई, तर मेटलच्या बांगड्या दिल्ली व कोलकात्याहून मागविल्या जातात. काचेच्या बांगड्यांचीच सर्वाधिक विक्री होते.
बांगड्यांनी दिला दीड हजार लोकांना रोजगार
शहरातील दीड हजार लोक बांगड्यांच्या व्यवसायात आहेत. संक्रात व लग्नसराईत बांगड्यांची सर्वाधिक विक्री होते. या व्यवसायात ७ होलसेल विक्रेते, ३०० दुकानदार, ५०० फेरीवाले व ७०० जण घरगुती व्यवसाय करीत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही बांगड्यांचा व्यवसाय करीत आहेत. बांगड्यांना या दीड हजार परिवारांना रोजगार मिळवून दिला आहे.
अडीच लाख डझन बांगड्या
शहरात अडीच लाख डझन बांगड्या आणण्यात आल्या आहेत. यातील १ लाख डझन बांगड्या ग्रामीण भागात विक्रीला पाठविण्यात आल्या आहेत.
संक्रांत पिवळ्या रंगावर
यंदा संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे. ही संक्रांत कुमारी अवस्थेतील असून, पिवळे वस्त्र नेसलेली आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. ईशान्य दिशेस पाहत आहे. पिवळ्या रंगाने रंगवलेल्या वस्तू परिधान करू नये, पण नैसर्गिक पिवळ्या रंगाच्या वस्तू, अलंकार चालतील. या वर्षी वाण देणे घेणे हळदी-कुंकू यासाठी पर्वकाळ सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे.
- वे.शा.सं. सुरेश केदारे गुरुजी