सहा गावांचे पाणी पिण्यास अयोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:08 AM2017-07-20T00:08:06+5:302017-07-20T00:10:03+5:30
गंगाखेड : तालुक्यातील सहा गावातील हातपंप, विंधन विहीर, विद्युतपंपाचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल १८ जुलै रोजी जिल्हा प्रयोगशाळेने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : तालुक्यातील सहा गावातील हातपंप, विंधन विहीर, विद्युतपंपाचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल १८ जुलै रोजी जिल्हा प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुुळे सहा गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
तालुक्यातील इळेगाव, मसनेरवाडी, गुंडेवाडी, बोथी, वरवंटी, वरवंटी तांडा, खंडाळी, खंडाळी तांडा, कौडगाव, धरमनगरी या दहा गावातील हातपंप, विंधन विहीर व सार्वजनिक नळ योजना आदी १४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने १४ व १५ जुलै रोजी संबंधित गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जिल्हा प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील इळेगाव येथील जि .प. शाळेतील हातपंप, मसनेरवाडी येथील गंगाधर लिंबोटकर यांची विहीर, वरवंटी येथील जि .प. शाळेतील हातपंप, वरवंटी तांडा येथील सार्वजनिक नळ योजना, खंडाळी जि.प. शाळे जवळील हातपंप, खंडाळी तांडा येथील मारोती मंदिराजवळील विद्युतपंप या सहा ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल १८ जुलै रोजी जिल्हा प्रयोगशाळेतून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे.
पिण्यासाठी अयोग्य असलेल्या पाणी स्त्रोतांचे शुद्धीकरण करून पाण्याची पूर्नतपासणी करून पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करावा, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.