शहरात ६ कामगारांचा यापूर्वीही मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू; मनपाकडे रेस्क्यू ऑपरेशन’ची यंत्रणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 04:30 PM2019-03-19T16:30:32+5:302019-03-19T16:43:56+5:30

मोठ्या दुर्घटनेनंतरही मनपा निद्रिस्तच 

6 workers die in Manhole; AMC does not have a rescue operation mechanism | शहरात ६ कामगारांचा यापूर्वीही मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू; मनपाकडे रेस्क्यू ऑपरेशन’ची यंत्रणाच नाही

शहरात ६ कामगारांचा यापूर्वीही मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू; मनपाकडे रेस्क्यू ऑपरेशन’ची यंत्रणाच नाही

googlenewsNext
ठळक मुद्दे‘रेस्क्यू ऑपरेशन’साठी अग्निशमनकडे यंत्रणा नाहीजीव धोक्यात घालून जवान मॅनहोलमध्ये कसे उतरणार?

औरंगाबाद : ड्रेनेजच्या चेंबरमध्ये कामगार गुदमरून मरण पावल्याच्या घटना शहरात यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. या घटनांमधून महापालिकेने कोणताही बोध घेतला नाही. एन-१२ भागात चार वर्षांपूर्वी ड्रेनेज चेंबर उघडल्यामुळे विषारी वायूने दोन जणांचा बळी घेतला होता. त्यापूर्वी मुकुंदवाडी येथे गणपती विसर्जनाच्या विहिरीतील गाळ काढताना विषारी वायूमुळेच चार कामगारांचा मृत्यू झाला होता. अशा घटनांमध्ये रेस्क्यू आॅपरेशनसाठी लागणारी यंत्रणाच महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सोमवारी चिकलठाणा भागातील पॉवरलुम येथे ड्रेनेजचे पाणी चोरणाऱ्या एका शेतमजुराला मोठ्या मेनहोलमध्ये शॉक लागला. त्याला वाचविण्यासाठी आणखी सहा जण खाली उतरले. ड्रेनेजच्या वायूमुळे गुदमरून दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. चार जण रुग्णालयात दाखल आहेत. एकाचा मृतदेह सापडला नाही. या गंभीर घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. मेनहोलमध्ये उतरून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाकडे कोणतेच साहित्य नाही. 

मेनहोलमध्ये उतरण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा ड्रेस आणि आॅक्सिजन मास्क आवश्यक असतो, या दोन्ही गोष्टींचा अभाव असल्याने जवान आत उतरू शकले नाहीत. शेवटी मेनहोल जेसीबीने फोडून आतील जखमी, मयत व्यक्तींना बाहेर काढावे लागले. अशा अशास्त्रोक्त पद्धतीचा महापालिका कुठपर्यंत वापर करणार? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. 

एन-१२ परिसरातील यादवनगर येथे खाजगी कंत्राटदाराच्या दोन मजुरांनी चार वर्षांपूर्वी ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी अचानक ढापा उघडला. या ढाप्याच्या आत अत्यंत विषारी वायू असतो याची जाणीवही कामगारांना नव्हती. छोट्याशा ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. मुकुंदवाडी येथे गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्यात येत होता. विहिरीत उतरून कामगार गाळ काढत होते. जुन्या गाळात मोठ्या प्रमाणात विषारी वायू होता. या विषारी वायूमुळे गुदमरून विहिरीत काम करणारे चार कामगार मरण पावले होते. या कामगारांचे मृतदेह काढतानाही अग्निशमन दलाला बरीच कसरत करावी लागली होती. शहरात अशा घटना आता वारंवार घडत असताना मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी अवजारेही नाहीत. 

शहरातील तिसरी घटना
मुकुंदवाडी गावात गणेश विर्सजनपूर्वी सार्वजनिक विहिरीतील गाळ काढताना चार मजुरांचा मृत्यू झाला होता. मृत मजूर कंत्राटदाराकडे कामाला होते. हडको एन-१२ भागातील यादवनगर येथे चार वर्षांपूर्वी ड्रेनेज चोकअप काढताना दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. हे कामही खाजगी कंत्राटदाराचे होते.चिकलठाण्यातील पॉवरलुम भागात सोमवारी दुपारी तिसरी घटना घडली. यामध्ये दोन जण मरण पावले. चार जण रुग्णालयात आहेत. एक बेपत्ता आहे.

Web Title: 6 workers die in Manhole; AMC does not have a rescue operation mechanism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.