६ वर्षीय बालकाने उडविली पोलिसांची झोप; 'त्याचे' जुन्या घरी जाण्याचे कारण कळताच सर्वजण झाले भावनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 02:57 PM2020-09-11T14:57:33+5:302020-09-11T15:05:03+5:30
पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून शोध सुरू केला होता.
औरंगाबाद : १० रुपये न दिल्यामुळे आजीच्या घरातून निघून गेलेल्या ६ वर्षीय बालकाने हर्सूल पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी रात्री झोप उडविली. १७ तासांनंतर तो सुखरूप घरी परतल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यासोबतच तो आजीचे घर सोडून चालत जुन्या घरी का गेला याचा उलगडा झाल्यानंतर सर्वजण भावनिक झाले.
हर्सूल परिसर, घृष्णेश्वरनगरात आजीकडे राहणारा ६ वर्षांचा रोहित (नाव बदलले) आजीने १० रुपये दिले नाही म्हणून बुधवारी सायंकाळी ५ वाजता घरातून निघून गेला. बराच शोध घेऊनही तो न सापडल्याने आजीने शेवटी हर्सूल ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून शोध सुरू केला. ही माहिती कळताच उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळांनी तिकडे धाव घेतली. उपरोक्त वरिष्ठांसह पोलीस निरीक्षक सचिन इंगोले हे पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. वायरलेस सेटवरून रोहितचे वर्णन कळवून त्याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले. सिडको बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन आणि शहरातील सर्व मंदिर, प्रार्थनास्थळे आदी ठिकाणी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सर्व अधिकाऱ्यांना बालकाचा शोध घेण्याचे सांगितले.
यामुळे रात्रभर आणि गुरुवारी सकाळपासून पुन्हा अधिकारी, कर्मचारी त्याचा शोध घेत होते. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चिकलठाणा परिसरातील महिला रोहितला घेऊन त्याच्या आजीच्या घरी आली. रोहित रात्री ८ वाजता त्याच्या आईला शोधत तेथे आला होता. तेथेच जेवण करून झोपला. त्याची आई त्या महिलेकडे वर्षभर भाड्याने घर घेऊन राहत होती. तेव्हा रोहित आणि त्याचा ११ वर्षांचा भाऊ तेथे राहत होते.
४ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईने दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला. ६ महिन्यांपासून रोहित आणि त्याच्या भावाला घृष्णेश्वरनगरात आजीकडे सोडून त्याची आई निघून गेली. आजी रागावल्याने आईच्या शोधात रोहितने पायीच चिकलठाणा येथील आई राहत होती ते घर गाठले. मात्र, तेथे त्याची आई नव्हती. घरमालक महिलेने गुरुवारी त्याला आजीकडे आणून घातल्याने पोलिसांची शोधमोहीम १७ तासांनंतर थांबली. आईच्या शोधात त्या निरागस बालकाने जुने घर गाठल्याचे कळल्यानंतर शोध घेणारे सर्वजण भावनिक झाले.