एक महिन्याच्या मुलासह ६ वर्षांच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:03 AM2021-04-28T04:03:27+5:302021-04-28T04:03:27+5:30
लहान मुलांवरही संकट : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या ७ औरंगाबाद : बालकांवर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच असून, घाटीत ...
लहान मुलांवरही संकट : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या ७
औरंगाबाद : बालकांवर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच असून, घाटीत उपचार सुरू असताना सोयगाव तालुक्यातील पावरी येथील एक महिन्याच्या बालकाचा आणि बीड जिल्ह्यातील ६ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवाने मृत्यू झाला. महिन्याभरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या ७ झाली आहे.
पावरी गावातील १ महिन्याच्या मुलाला उपचारासाठी २१ एप्रिल रोजी घाटीत दाखल करण्यात आले होते. या बालकाने सात दिवस कोरोनाशी झुंज दिली. परंतु त्याची ही झुंज मंगळवारी अपयशी ठरली. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी ९ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. ‘सिव्हिअर एक्युट रेस्पीरेटरी डिसट्रेस सिंड्रोम विथ सेप्टीक शाॅक विथ सिव्हिअर कोविड -१९ न्यूमोनिया विथ पायोमेनीनजायटीस’ असे चिमुकल्याच्या मृत्यूचे कारण नमूद करण्यात आले आहे. त्याबरोबर मंडुजाळी, बीड येथील ६ वर्षांच्या मुलीला २६ एप्रिल रोजी उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना रात्री सव्वाआठ वाजता या मुलीचा मृत्यू झाला. घाटीत दाखल झाल्याच्या दिवशीच मुलीने जगाचा निरोप घेतला. बालकांच्या उपचारासाठी डाॅक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु दाखल होतानाच गंभीर असल्याने उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. बालकांच्या मृत्यूने आरोग्य कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
चौकट
यापूर्वी ५ मुलांचा मृत्यू
घाटीत गेल्या महिनाभरात २९ दिवसांचे बाळ, ६ महिन्यांची मुलगी, ३ वर्षीय बालिका, १४ वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बालकांकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसल्यावर वेळीच उपचार घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.