६० फुटांचे शिवलिंग,गाभाऱ्यात १२ ज्योतिर्लिंग;वेरूळमध्ये साकारतेय देशातील सर्वात मोठे शिवमंदिर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 03:54 PM2022-02-28T15:54:31+5:302022-02-28T15:55:54+5:30
Mahashivratri Special: वेरूळहून कन्नडकडे जाणाऱ्या महामार्गावर श्री विश्वकर्मा तीर्थधाम संस्था असून या ठिकाणी भगवान श्री विश्वकर्माचे मंदिर आहे. या परिसरात बारा ज्योतिर्लिंग मंदिराचे काम सुरू आहे.
- सुनील घोडके
खुलताबाद ( औरंगाबाद ) : देशातील सर्वाधिक उंचीचे शिवमंदिर वेरूळमधील श्री. विश्वकर्मा तीर्थधाम परिसरात साकारले जात आहे. प्रत्यक्षात ६० फुटाचे शिवलिंग प्रतिकृतीचे मंदिर असून त्याच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी १२ ज्योतिर्लिंगांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तब्बल २३ वर्षांपासून सुरू असलेले मंदिराचे काम पूर्ण झाले असून १ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर ते भाविकांसाठी खुले होणार आहे.
वेरूळहून कन्नडकडे जाणाऱ्या महामार्गावर श्री विश्वकर्मा तीर्थधाम संस्था असून या ठिकाणी भगवान श्री विश्वकर्माचे मंदिर आहे. या परिसरात बारा ज्योतिर्लिंग मंदिराचे काम सुरू आहे. मंदिराचा परिसर १०८ बाय १०८ फूट आकाराचा आहे. जमिनीपासून शिवलिंगाची उंची ६० फूट, तर मंदिराच्या छतापासून ४० फूट आहे. शाळुंका ३८ फूट रूंद आहे. पावसाळ्यात पिंडींवर पडणारे पाणी शाळुंकेतून खाली पडतानाचे दृश्य नयनरम्य ठरेल. पिंडीसह संपूर्ण मंदिराचा रंग काळा आहे.
शिवमहिमा कथेस प्रारंभ
वेरूळ येथे देशातील सर्वात मोठे शिवमंदिर उभारले जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंग मंदिराचे १ मार्च रोजी उद्घाटन होणार आहे. वेरूळ येथे महेंद्र बापू यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दिवस धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात २५ फेब्रुवारीपासून ८ ते १२ या वेळेत शिवलिंग प्राणप्रतिष्ठा यज्ञ, दुपारी जयंतीभाई शास्त्री यांच्या वाणीतून शिवकथा होईल. १ मार्च रोजी महाशिवरात्रीदिन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. यजमान खारेचा व कडीया परिवाराच्याहस्ते शिवपूजन होणार आहे, असे आवाहन विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेने केले आहे.
वेरूळच्या सौंदर्यात भर
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंंग श्री घृष्णेश्वर, संत जनार्दन स्वामी आश्रम, मालोजीराजे यांच्या मालकीची गढी, शहाजीराजे भोसले स्मारक, प्रसिध्द गणेशपीठ लक्षविनायक मंदिर, महादेव वनउद्यान, अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड, जैन धर्मांचे पहाड मंदिर या तीर्थस्थळात आता शिवमंदिराची भर पडणार आहे.
शिवमंदिराची अशी आहे रचना...
बारावे ज्योतिर्लिंंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासह वेरूळ लेणी व विविध धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी पर्यटक व भाविकांची वर्षभर वेरूळमध्ये गर्दी असते. भाविकांना आता एकाच मंदिरात १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडणार आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या मंदिराची उभारणी केली गेली. श्री विश्वकर्मा तीर्थधामचे महेंद्र बापू यांनी यासाठी पुढाकार घेतला. महेंद्र बापू गुजरातच्या बडोदा जिल्ह्यातील चानोंदचे असून त्यांच्या देखरेखीखाली काम पूर्ण केले गेले.
महाशिवरात्रीला खुले होणार
१९९९-२००० मध्ये मंदिराच्या कामाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला १०८ फूट उंचीचे शिवलिंग उभारण्याची योजना होती. परंतु निधीअभावी मध्ये काही वर्षे मंदिराचे काम बंद पडले होते. गेल्यावर्षी जूनमध्ये कामाला वेग आला. महाशिवरात्रीला भाविकांसाठी मंदिर खुले होईल. देशातील सर्वात मोठे शिवलिंग मंदिर ठरणार आहे, असा दावा मंदिराचे प्रमुख जयंतीभाई शास्त्री यांनी केला.