६० कावळ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:01 AM2017-11-22T02:01:53+5:302017-11-22T02:01:58+5:30
चिंचोली लिंबाजी येथे मंगळवारी अचानक जवळपास ५० ते ६० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही निसर्गप्रेमींनी अत्यावस्थेत असलेल्या जवळपास ५० कावळ्यांना वेळीच पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचोली लिंबाजी : चिंचोली लिंबाजी येथे मंगळवारी अचानक जवळपास ५० ते ६० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही निसर्गप्रेमींनी अत्यावस्थेत असलेल्या जवळपास ५० कावळ्यांना वेळीच पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करून उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले. कावळ्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण समजू शकले नसले तरी विषबाधेमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मंगळवारी गावात सकाळपासूनच झाडावर व इतरत्र वास्तव्यास असलेले कावळे अचानक अत्यवस्थ होऊन खाली जमिनीवर पडू लागले. काही वेळातच तडफडून जवळपास ५० ते ६० कावळ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने काहींनी अत्यावस्थेत असलेल्या जवळपास ५० कावळ्यांना तात्काळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. धनंजय महाजन, उत्तम गिरी व त्यांच्या सहकाºयांनी या कावळ्यांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले.
या कावळ्यांचा मृत्यू मृत जनावरांचे मास खाल्याने झाल्याची चर्चा आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांनी अनेक बकºया, लहान वासरे यांच्यावर हल्ले करून जखमी केले होते.
त्यामुळे त्यात काहींचा मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठी काहींनी मृत जनावरांच्या मासावर विषारी औषधी टाकले असावे. ते मास झाल्यामुळेच कावळ्यांचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा नागरिकांत होती.