नाताळ-नववर्षानिमित्त ६० हजार छत्रपती संभाजीनगरवासीय पर्यटनाला; 'या' ठिकाणांना पसंती
By संतोष हिरेमठ | Published: December 22, 2023 01:52 PM2023-12-22T13:52:01+5:302023-12-22T13:52:57+5:30
पर्यटनाच्या प्लॅनिंगने विमान, रेल्वे, बसगाड्यांची बुकिंग होतेय फुल
छत्रपती संभाजीनगर : नाताळ आणि नवीन वर्षाच्या जल्लोषासाठी शहरवासीयांची पावले विविध पर्यटन आणि धार्मिक स्थळांकडे वळणार आहेत. त्यासाठी विमान, रेल्वे, बसगाड्यांची बुकिंग करण्यावर भर दिला जात आहे. आगामी १० दिवसांत किमान ६० हजार शहरवासीय विविध ठिकाणी पर्यटनाला जातील, असे टूर्स व्यावसायिकांनी सांगितले.
नाताळ सण, वीकेण्ड आणि त्यानंतर सरत्या वर्षाला निरोप असा तिहेरी योग जुळून आल्याने सुट्यांचा आनंद पर्यटनाच्या ठिकाणी घेण्याकडे शहरवासीयांचा ओढा दिसून येत आहे. अनेकांनी काही महिन्यांआधीच पर्यटनाचे नियोजन केलेले असल्याने त्यांना अगदी कमी दरात सहलीचा आनंद घेता येणार आहे; परंतु ऐनवेळी नियोजन करणाऱ्यांना अधिक रक्कम मोजावी लागत आहे. पर्यटनाच्या प्लॅनिंगने विमान, रेल्वे, बसगाड्यांची बुकिंग होत असल्याचे सांगण्यात आले.
कोणत्या ठिकाणांना पसंती?
गोवा, कोकण, काश्मीर, राजस्थान, बंगळुरू, हम्पी, बदामी, स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्थळांकडे पर्यटकांचा ओढा आहे. त्याबरोबर तिरुपती बालाजी, अयोध्या या ठिकाणाकडेही ओढा आहे. कोरोनामुळे केरळ चर्चेत असले असले तरी पर्यटकांचा ओढा केरळकडे कायम असल्याचेही सांगण्यात आले.
गोव्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याकडे दुर्लक्षच
नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गाेव्याला जाण्यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, गोव्यासाठी विशेष रेल्वेच्या मागणीकडे दुर्लक्षच करण्यात आल्याने या ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅव्हल्स, खाजगी वाहनाने अथवा अन्य शहर गाठून रेल्वेने प्रवास करावा लागत आहे.
४ ते ५ दिवसांच्या पर्यटनाला पसंती
नाताळच्या वेळी सलग सुट्या आल्या आहेत. त्यामुळे ४ ते ५ दिवसांत होणाऱ्या पर्यटनाला पसंती दिली जात आहे. नववर्षापर्यंत किमान शहरातून जवळपास ६० हजार नागरिक विविध ठिकाणी पर्यटनाला जातील. अयोध्याला जाण्याकडेही कल वाढला आहे.
- मंगेश कपोते, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद