पक्षकाराकडे मागितली ६० हजार रुपये लाच , वकिलाला एसीबीकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:24 AM2019-04-10T00:24:21+5:302019-04-10T00:24:58+5:30
खुलताबाद येथील नायब तहसीलदार यांच्यासमोर चालू शेतीसंबंधी केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देण्यासाठी पक्षकार महिलेकडे ६० हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी एका वकिलाला अटक केली.
औरंगाबाद : खुलताबाद येथील नायब तहसीलदार यांच्यासमोर चालू शेतीसंबंधी केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देण्यासाठी पक्षकार महिलेकडे ६० हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी एका वकिलाला अटक केली.
शरद विठ्ठलराव भागडे (रा. लक्ष्मी कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिलेच्या पतीचे निधन झालेले आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी तक्रारदार यांना ‘हिबानामा’च्या आधारे (स्वत:च्या मालकीची जमीन दुसऱ्याच्या नावे करून देणे) शेती दिली होती. या शेतीचा फेर त्यांच्या नावे घेण्यासाठी महिलेने महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. मात्र, त्यांच्या नावे फेर घेण्याबाबत आक्षेप असल्याने हे प्रकरण खुलताबाद येथील नायब तहसीलदार यांच्यासमोर निर्णयासाठी गेले. याबाबत नायब तहसीलदार सुनावणी घेत होते.
याप्रकरणात नायब तहसीलदार यांना सांगून तुमच्या बाजूने निकाल लावून देतो, असे सांगून अॅड. शरद भागडे यांनी तक्रारदार महिलेकडे ६० हजार रुपये लाचेची मागणी केली. महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा पंचासमक्षही अॅड. शरद यांनी महिलेकडे लाचेची मागणी केली. मात्र, त्यांनी लाचेची रक्कम घेतली नाही. दरम्यान ९ एप्रिल रोजी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अॅड. शरदविरोधात क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी अॅड. शरदला अटक करून आज न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने अॅड. शरद यांना १२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावत हर्सूल कारागृहात रवानगी केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस कर्मचारी अश्वलिंग होनराव, भीमराज जिवडे, कल्याण सुरासे, संतोष जोशी यांनी केली.