डेल्टा प्लसचा ६० वर्षीय रुग्ण ठणठणीत; महिनाभरापूर्वी घेतला कोरोनावर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 06:43 PM2021-08-10T18:43:31+5:302021-08-10T18:46:30+5:30
Delta Plus Corona patient in Aurangabad : या रुग्णास सध्या कोणतीही लक्षणे नसून प्रकृती चांगली आहे.
औरंगाबाद : औरंगाबादेत डेल्टा प्लस व्हेरिएंटने शिरकाव केल्याने सोमवारी एकच खळबळ उडवली. आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर या रुग्णाचा शोध घेतला. तेव्हा डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण हा ६० वर्षीय असून, तो सिडको वाळूज महानगर-१ येथील रहिवासी असल्याचे समोर आले. आरोग्य पथकाने तत्काळ तिकडे धाव घेतली, तेव्हा सदर रुग्ण आपल्या इलेक्ट्रिक दुकानात नियमित कामकाज करण्यात व्यस्त होते. रुग्णाची प्रकृती ठणठणीत असल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
सदर रुग्णाच्या घरी ‘आयडीएसपी’ आणि दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने सोमवारी भेट दिली. या रुग्णास सध्या कोणतीही लक्षणे नसून प्रकृती चांगली आहे. रुग्णाने अजूनपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा एकही डोस घेतलेला नाही. या रुग्णांची २ जुलै रोजी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल ३ जुलै रोजी पाॅझिटिव्ह आला होता. यानंतर रुग्णाने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. पाच दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती चांगली झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. फाॅलोअपसाठी गेल्यानंतर इतर त्रासामुळे रुग्णाला नाॅन कोविड वाॅर्डात भरती करण्यात आले होते. तेव्हाही तब्येतीत सुधारणा झाल्याने पाच दिवसांनंतर सुटी देण्यात आली. ३ जुलै रोजी पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा स्वॅब नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाला.
रुग्णाच्या वसाहतीचे सर्वेक्षण
रुग्ण राहात असलेल्या परिसरात आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रुग्णाच्या घरातील सर्व सदस्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्याची सूचना करण्यात आली. त्याबरोबरच परिसरातील सर्वेक्षणात जर कोणी संशयीत अथवा सारीचे रुग्ण आढळले तर त्यांचीही आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे.
रुग्णाची प्रकृती चांगली
डेल्टा प्लसच्या रुग्णाची प्रकृती चांगली आहे. त्याला सध्या कोणतीही लक्षणे नाहीत. परिसरात पथकातर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयीत रुग्णांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येईल.
- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी.