‘समृद्धी’ला लागणार ६०० कोटी लिटर पाणी; कंत्राटदारानेच पाण्याचे नियोजन करण्याची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:30 PM2019-05-30T13:30:22+5:302019-05-30T13:32:12+5:30
७० टक्के दुष्काळ असलेल्या भागातून जाणार मार्ग
- विकास राऊत
औरंगाबाद : मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवे अर्थात समृद्धी महामार्गाच्या बांधणीला तब्बल ६०० कोटी लिटर पाणी लागणार असून त्याची उपलब्धता संबंधित कंत्राटदाराला करावी लागणार आहे.
पाणी मिळण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनादेखीलसंपर्क केला असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ७० टक्के दुष्काळ असलेल्या भागातून महामार्ग बांधणीचे काम सुरू असून, या भागात पाणी नाही. असे असताना पाण्याविना काम थांबले तर कंत्राटदाराला दंड लावणार काय? यावर सहव्यवस्थापकीय संचालक गायकवाड म्हणाले, पाण्यामुळे कामास विलंब झाला तर दंड लागणार नाही. मात्र इतर कारणांमुळे जर कामाला विलंब झाला तर ०.०५ टक्के दंड कंत्राटदाराला आकारण्यात येईल. तसेच निर्धारित डेडलाईनपूर्वी काम केले तर ०.०३ टक्के बोनस कंत्राटदाराला देण्यात येईल. आजवर कुणालाही दंड आकारलेला नाही. समृद्धी महामार्ग ७०१ कि़ मी. लांबीचा असून, १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर ७ ते ८ तासांवर येणार आहे.
एका हंगामासाठी ९०० हेक्टरला पुरेल पाणी
समृद्धीच्या बांधणीला लागणारे ६०० कोटी लिटर पाणी ९०० हेक्टर जमिनीला एका हंगामासाठी पुरू शकेल. महामार्ग बांधणीला मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे. ६ दशलक्ष घनमीटर इतके पाणी लागणार आहे. जवळपास एक पाझर तलाव भरूनच हे पाणी लागणार आहे. पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, असे मत मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे यांनी सांगितले.
भूसंपादनासह ८ हजार कोटी
भूसंपादनासह ८ हजार कोटी लागले आहेत. त्यात १६२७ कोटी कंत्राटदारावर आणि ईपीसी कन्सल्टंटवर व ६५०० कोटी रुपये भूसंपादनासाठी खर्च झाले आहेत. भूसंपादनाचा मुद्दा आता संपला आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावे, गंगापूरमधील ११ गावांतील व वैजापूरमधील १५ गावांतील जमीन महामार्गासाठी संपादित केली आहे. जालना जिल्ह्यातील २५ गावांतील भूसंपादन झाले आहे.
भूमिपूजन निश्चित नाही
माईलस्टोनच्या पुढे महामार्गाचे काम सुरू झाले असले तरी भूमिपूजन अजून निश्चित झालेले नाही. भूमिपूजनाच्या तारखेबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही, असे सहव्यवस्थापकीय संचालक गायकवाड यांनी सांगितले. १६ पॅकेजस्मध्ये महामार्गाचे काम होणार असून ८, ९ आणि १० हे तीन पॅकेज औरंगाबाद-जालन्यातील आहेत. ८ व १० पॅकेजचे काम वेगाने सुरू आहे. पॅकेज क्र.९ उशिरा सुरू झाले आहे.
२८ हजार कोटींचे कर्ज
महामार्गाच्या बांधकामासाठी २८ हजार कोटींचे कर्ज काढण्यात येणार आहे.
२७ हजार कोटींची इक्विटी आहे, तर ६ हजार ३९६ कोटी रुपये सरकारी वाटा असणार आहे. ५५ हजार कोटींचा हा प्रकल्प असून, जुलै २०२१ पर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, असा दावा गायकवाड यांनी केला. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे.