गरज नसलेल्या बुलेट ट्रेनला ६ हजार कोटी, तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना छदामही नाही: अंबादास दानवे
By विकास राऊत | Published: August 10, 2022 03:14 PM2022-08-10T15:14:55+5:302022-08-10T15:16:54+5:30
विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांचे क्रांती चौकात शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले.
औरंगाबाद: महाराष्ट्राला गरज नसलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकारने ६ हजार कोटी दिले आहेत. मात्र, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना छदामही दिला नाही, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. भाजपने ज्या आमदारांना विरोध केला त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे, यातुने त्यांचा ढोंगीपणा दिसून येत आहे. याविरोधात सामान्य शिवसैनिकांसह रान उठवू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
विधान परिषद विरोधी पक्ष नेतेपदी अंबादास दानवे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे आज दुपारी औरंगाबादेत आगमन झाले. क्रांती चौकात शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे हे फार्म हाऊस उदघाटन, गद्दाराच्या घरी भेटी देण्यात गुंतले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्याला गरज नसलेल्या बुलेट ट्रेनला ६ हजार कोटी देण्यात येतात तर शेतकऱ्यांना छदामही दिला नाही,अशी टीका दानवे यांनी केली. तसेच अधिवेशनापूर्वी नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचेही दानवे यांनी जाहीर केले.
भडारा, माहूर येथे महिला अत्याचार घटना घडल्या आहेत. सरकारचा वचक नसल्याने अशा गंभीर घटना घडत आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र गद्दाराचा महाराष्ट्र झाला आहे. मंत्रीमंडळातील अब्दुल सत्तार यांचे हात घोटाळ्यात अडकले आहेत, तसेच संजय राठोड यांच्यावर महिला अत्याचाराचे आरोप आहेत. पूर्वी भाजप यांना विरोध करत होती. आता मंत्रिमंडळात घेतले. हा भाजपचा ढोंगीपणा आहे. याविरोधात शिवसेना रान उठवेल असेही दानवे म्हणाले. गंभीर आरोप असलेल्या मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात येईल असेही दानवे म्हणाले.