अग्निवीर भरतीसाठी रोज ६ हजार तरुण, अन्न-पाण्यावाचून हाल; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 01:02 PM2022-08-19T13:02:34+5:302022-08-19T13:03:05+5:30
भरती यंत्रणेची घेतली बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना
औरंगाबाद : अग्निवीरच्या भरतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडांगणावर सुरुवात झाली. यासाठी ८६ हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. भरतीसाठी आलेल्या तरुणांचे अन्न-पाण्यावाचून हाल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या १८ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भरतीचे समन्वयक म्हणून सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या.
जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा प्रशासन भरती प्रक्रियेत समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना अल्पोपाहार देण्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जवळपास ८६ हजार तरुणांनी भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. शनिवारी १३०० तरुण भरतीसाठी सहभागी झाले होते, तर १४ ऑगस्टपासून दररोज ६ हजार तरुण सहभागी होत आहेत. विद्यापीठाच्या क्रीडांगणावर तरुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येत आहे. भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पोपाहार देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अनेक सामाजिक संस्थांची बैठक घेऊन त्यांना यामध्ये सहभागी करून घेतले आहे. जे तरुण शारीरिक चाचणी पूर्ण करून पात्र ठरतील, अशा तरुणांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी अपात्र ठरत आहेत, त्यांच्याही अल्पोपाहाराची व्यवस्था सामाजिक संस्थांनी केली आहे. ही भरती ९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
तो तरुण चाचणीपूर्वीच खाली पडला
करण नामदेव पवार (वय २०, रा. कन्नड) हा मैदान चाचणीपूर्वीच खाली पडला. त्यातच त्याच्या हृदयावर दबाव आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. भरतीसाठी आलेल्या प्रत्येकाला संबंधित अधिकारी सूचना देत आहेत. कुणालाही काही इतर आजार असेल तर त्याबाबतही विचारणा करीत आहेत.