कोविशिल्डचे ६० हजार डोस मिळाले, पण जिल्ह्याला काेव्हॅक्सिनची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:02 AM2021-04-14T04:02:36+5:302021-04-14T04:02:36+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयास कोविशिल्ड लसीचे ६० हजार डोस मिळाले, मात्र, काेव्हॅक्सिन लसीची प्रतीक्षा कायम आहे. या ...
औरंगाबाद : औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयास कोविशिल्ड लसीचे ६० हजार डोस मिळाले, मात्र, काेव्हॅक्सिन लसीची प्रतीक्षा कायम आहे. या लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. परंतु या लसी मिळण्यासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे सध्या नागरिकांना कोविशिल्ड लस घेण्याचाच पर्याय उरला आहे.
आरोग्य उपसंचालक कार्यालयास मिळालेल्या लसींपैकी ३० हजार डोस मनपाला आणि दहा हजार डोस जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणजे ग्रामीण भागासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे किमान कोविशिल्ड लसींचा आठवडाभर तुटवडा जाणवणार नाही. सोमवारपर्यंत या लसींचा नवा साठा मिळणार आहे. परंतु काेव्हॅक्सिन लसीची अवस्था आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. या लसींचा आगामी दोन ते तीन दिवसांत पुरवठा होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्याला काेव्हॅक्सिनचे आतापर्यंत २२ हजार डोस मिळाले आहे. या सगळ्यातच पहिला आणि दुसरा डोस देण्याची कसरत करावी लागत आहे. या लसींचा साठा मिळत नसल्यानेच नव्या लाभार्थ्यांना या लसी देणे बंद करण्यात येत आहे. परंतु ज्यांना हीच लस घ्यायची आहे, त्यांचा हिरमोड होत आहे. त्यातून अनेक जण लसच घेण्याचे टाळत आहे. तर ज्यांनी या लसीचा पहिला डोस घेतला आहे, किमान त्यांना तरी दुसरा डोस अगदी सहजपणे मिळणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.
गुरुवारपर्यंत मिळणार
कोविशिल्ड लसीचा साठा मिळाला आहे. हा साठा रविवारपर्यंत भागेल. महापालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे उपलब्ध साठा पाहून नव्या लसींचे वाटप करण्यात आले आहे. सोमवारी आणखी लसी प्राप्त हाेतील. तर काेव्हॅक्सिन लसी गुरुवारपर्यंत दाखल होतील.
-डाॅ. स्वप्नील लाळे, आराेग्य उपसंचालक