औरंगाबादमधील चिश्तिया चौक ते बजरंग चौक रस्त्याची तब्बल ६१ फूट जागा गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:50 PM2018-01-24T23:50:53+5:302018-01-25T11:42:06+5:30
सिडको-हडकोचे महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर या भागाची अक्षरश: ‘वाट’लावण्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. एका आयडियल शहरातील रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहेत. चिश्तिया चौक ते बजरंग चौक हा रस्ता कागदावर २४ मीटर म्हणजेच ८० फूट दर्शविण्यात आला आहे. ‘लोकमत’चमूने बुधवारी या रस्त्याची मोजणी केली असता कुठे १९ तर कुठे १५ फूटच रस्ता शिल्लक आहे. उर्वरित ६१ फूट रस्त्याची जागा कोणी गिळंकृत केली हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
- मुजीब देवणीकर/प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : सिडको-हडकोचे महापालिकेकडे हस्तांतरण झाल्यानंतर या भागाची अक्षरश: ‘वाट’लावण्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. एका आयडियल शहरातील रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत आहेत. चिश्तिया चौक ते बजरंग चौक हा रस्ता कागदावर २४ मीटर म्हणजेच ८० फूट दर्शविण्यात आला आहे. ‘लोकमत’चमूने बुधवारी या रस्त्याची मोजणी केली असता कुठे १९ तर कुठे १५ फूटच रस्ता शिल्लक आहे. उर्वरित ६१ फूट रस्त्याची जागा कोणी गिळंकृत केली हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
१९७०-८० च्या दरम्यान शहरात मोठमोठे उद्योग सुरू झाले. या उद्योगांमध्ये काम करणा-या कामगार वर्गासाठी तत्कालीन मंत्री डॉ. रफिक झकेरिया यांनी सिडको-हडकोची मुहूर्तमेढ रोवली. तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या हस्ते सिडकोच्या गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. सिडको प्रशासनाने भविष्यात शहराची वाढणारी लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून एक सुंदर आयडियल शहर निर्माण केले. १ एप्रिल २००६ रोजी या आयडियल शहराचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्यात आले. मागील १२ वर्षांमध्ये महापालिकेने या शहराचे कशा पद्धतीने वाटोळे केले हे सर्वश्रुत आहे.
सिडको-हडकोतील सर्वात मोठे रस्ते अतिक्रमणांनी व्यापले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो याची जाणीवच महापालिकेला राहिलेली नाही. ‘लोकमत’ने मागील काही दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्ते मोजण्याची मोहीम उघडली असून, बुधवारी चिश्तिया चौक ते बळीराम पाटील हा ८० फुटांचा रस्ता मोजण्यात आला. चिश्तिया चौकाच्या दर्शनालाच रस्ता एका बाजूने १९ फूट वापरात होता. पुढे दुसरी बाजू मोजण्यात आली. तेथे तर आणखी विदारक चित्र पाहायला मिळाले. रस्त्यावर उभ्या वाहनापासून दुभाजकापर्यंत १५ फूट रस्त्याची जागा शिल्लक होती. उर्वरित ६५ फूट रस्त्याची जागा गेली कुठे? तर उत्तर साधे व सोपे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजंूनी व्यापारी मोठ्या प्रमाणात आहेत. व्यापा-यांनी आपली दुकाने कुठे दहा फूट तर कुठे पंधरा फूट पुढे आणली आहेत. त्यानंतर दुकानांसमोर दुचाकी, चारचाकी वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहनधारकांना पन्नास टक्के रस्त्याचा वापर करावा लागतोय.
रस्ता अरुंद होण्याची कारणे
- बहुतांश दुकानासमोर पेव्हरब्लॉक टाकून अतिक्रमण.
- दुकानासमोर पत्र्यांचे जाहिरात फलक उभारल्यामुळे वाहतुकीला अडथळा.
- आविष्कार चौकात चहा-नाश्त्याच्या हातगाड्यांमुळे रस्ता होतो अरुंद.
- राजीव गांधी क्रीडांगण शॉपिंग सेंटरसमोर पाणीपुरीच्या गाड्या व त्या समोर कार, दुचाकी उभ्या राहत असल्याने रस्ता होतो लहान.
- हातगाडी, कार, रिक्षा रस्त्यांवर उभ्या राहत असल्याने आविष्कार चौक अरुंद.
- बजरंग चौकाच्या अलीकडील चौकात ड्रेसची दुकाने व हॉस्पिटलसमोर कार पार्किंगने रस्ता होतो निमुळता.
- बजरंग चौकात एक बाजूला सिमेंटचा उंच रस्ता तर दुस-या बाजूला डांबरी खोल रस्त्यामुळे घडतात अपघात.
- एन-७ कॉर्नरवरील दारूच्या दुकानांमुळे वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने चौक अरुंद.
- दुकानासमोर एक कार उभी राहिली तरी वाहतूक खोळंबा होतो.