शहरात ६२ फिक्स पॉइंट; पेट्रोलिंगसाठी विशेष पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:04 AM2021-03-29T04:04:41+5:302021-03-29T04:04:41+5:30
औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस विभागासह, राज्य राखीव पोलीस दल आणि होमगार्ड यांचीही ...
औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस विभागासह, राज्य राखीव पोलीस दल आणि होमगार्ड यांचीही नियुक्ती करण्यात आली असून, ठिकठिकाणी ६२ फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहेत.
औरंगाबाद शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत चौकाचौकांत फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहेत. प्रत्येक फिक्स पॉइंटवर सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान आठ कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी या पॉइंटवर ४ पोलीस कर्मचारी आणि अमलदार तैनात असतील. त्यानुसार सिटीचौक ७, जिन्सी ६, सिडको आणि जवाहरनगर प्रत्येकी ५ , क्रांतीचौक, एमआयडीसी वाळूज, एमआयडीसी सिडको आणि बेगमपुरा प्रत्येकी ४, वेदांतनगर, छावणी, वाळूज, दौलताबाद, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, आणि उस्मानपुरा प्रत्येकी ३, हर्सूल आणि सातारा येथे प्रत्येकी दोन ठिकाणी पॉइंट लावण्यात येणार आहेत. या बंदोबस्तासाठी एकूण २६९ होमगार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या फिक्स पॉइंटवर बॅरिकेडस् लावण्यात येणार आहेत. शिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय पेट्रोलिंग करण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. यासाठी ८ पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके त्यांना दिलेल्या कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करणार आहेत. याशिवाय मोटारसायकल पेट्रोलिंग करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आले असून, यासाठी दिवसा ३४ आणि रात्री ३४, असे कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
फिक्स पॉइंट पेट्रोलिंगसाठी नेमण्यात आलेल्या पथकांना चोऱ्या, घरफोडी होणार नाहीत याचीही दक्षता घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.