सावकारी कर्जाचा विळखा; मराठवाड्यात ८ महिन्यांत ६२६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 01:08 PM2022-08-24T13:08:31+5:302022-08-24T13:10:47+5:30
पीककर्ज वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज काढून शेतीमध्ये गुंतवणूक केली. त्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले
औरंगाबाद : मराठवाड्यात आठ महिन्यांत ६२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यातील बहुतांश आत्महत्या सावकारी कर्जाच्या जाचामुळे झाल्याचे बोलले जात आहे. तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया जात आहे. यंदाही तशीच अवस्था असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. सावकारी कर्जासह इतर अनेक बाबीही शेतकरी आत्महत्येस कारणीभूत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात १०९, जालना ७७, परभणी ५०, हिंगोली २४, नांदेड ८९, बीड १७०, लातूर ३६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ७१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
मागील दोन महिन्यांत १०० हून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. पीककर्ज वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज काढून शेतीमध्ये गुंतवणूक केली. त्यातही अतिवृष्टीमुळे विभागातील सुमारे ८ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अस्मानी संकटाचा सामना करण्यासह बँकांकडूनही शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्यामुळे शेतकरी नैराश्येच्या गर्तेत जात आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी उभारी २.० हा उपक्रम राबवित आहेत.
सरकारची भूमिका काय ?
३१ जुलै रोजी मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्या दिवशी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चिंता व्यक्त केली होती. याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचेही जाहीर केले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबविण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल.
विभागात फक्त ६३ टक्के पीककर्ज वाटप
मराठवाड्यात आजवर ६३ टक्के शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप झाले आहे, तर दुसरीकडे ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अद्याप ३७ टक्के पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. पेरण्या मात्र पूर्ण झाल्या असून ज्या शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज दिले नाही, त्यांनी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरण्या केल्याचे यातून दिसते आहे.