६३ फूट उंच मंदिराच्या कळसाच्या जागी शिवलिंग; १२ ज्योर्तिलिंगाचे एकाच ठिकाणी होते दर्शन
By प्रशांत तेलवाडकर | Published: August 12, 2024 01:06 PM2024-08-12T13:06:24+5:302024-08-12T13:13:18+5:30
महाराष्ट्रात महादेवाचे असंख्य मंदिर आहेत. मात्र, संपूर्ण मंदिरालाच शिवलिंगाचे रुप दिलेले ‘इलोडगड’ तील १२ ज्योर्तिलिंग शिवालय एकमेव ठरत आहे.
छत्रपती संभाजीनगर : तब्बल ६३ फूट उंच महाशिवलिंगाचा आकार मंदिर तुम्हाला दिसले तर आणि त्या खाली एकाच ठिकाणी १२ ज्योर्तिलिंगाचे दर्शन घडले तर... हे काही स्वप्न नाही... सूर्या इतके सत्य आहे. तेही आपल्या वेरूळ घृष्णेश्वर मंदिरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘इलोडगड’ येथे. श्रावण सोमवार हे महाराष्ट्रातील असे एकमेव महादेव मंदिर बघण्यासाठी भाविकांची झुंबड उडत आहे.
महाराष्ट्रात महादेवाचे असंख्य मंदिर आहेत. मात्र, संपूर्ण मंदिरालाच शिवलिंगाचे रुप दिलेले ‘इलोडगड’ तील १२ ज्योर्तिलिंग शिवालय एकमेव ठरत आहे. त्यामुळेच अल्पावधीत या मंदिर शिवभक्तांमध्ये एवढे प्रसिद्ध झाले की, मुंबईहूनही भाविक येथे दर्शनासाठी येत आहे. तसेच घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनाला येणार भाविकही आर्वजून हे मंदिर ‘याचि देही याची डोळा’ बघण्यासाठी येत आहेत.
मंदिराच्या कळसाच्या जागी शिवलिंग
१२ ज्योर्तिलिंग शिवालयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यास कळस नाही. कळसाच्या जागेवर शिवलिंग तयार करण्यात आले आहे. त्याचा आकार ३६ फूट उंच आहे आणि जलधारा १०८ फूट लांबीची आहे. खाली मंदिराच्या गाभाऱ्यात १२ ज्योर्तिलिंगाची अर्धेचंद्रकोर आकारात मांंडणी केली आहे. सर्व शिवलिंग मध्यप्रदेशातील उज्जैन महाकालेश्वर येथून आणण्यात आले आहे. मध्यभागी ‘सोमनाथ’ ज्योर्तिलिंग आहे. या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा महाशिवरात्रीला २०२१ मध्ये करण्यात आली.
भगवान विश्वकर्माचे प्रगट स्थान
१२ ज्योर्तिलिंग शिवालयाच्या बाजूला आणखी एक भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. हा परिसर भगवान विश्वकर्माचे प्रगट स्थान म्हटल्या जाते. म्हणून तिथे भगवान विश्वकर्माची मूर्ती स्थापित केली आहे.
इलोडगड येथील मंदिराचे वैशिष्ट्य
१) ६३ फूट उंच शिवलिंगाचा आकारातील मंदिर.
२) ३६ फूट उंच शिवलिंगच मंदिराचा कळस
३) १०८ फूट लांबीची जलधारी
४) १२ ज्योर्तिलिंगाचे एकच ठिकाणी दर्शन
५) ७ एक मंदिराचा परिसर
६) १५ वर्षे लागले हे मंदिर बनवायला