मराठवाड्यातील ६४ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 04:04 PM2019-03-27T16:04:12+5:302019-03-27T16:09:50+5:30
चाराटंचाईमुळे ८७५ छावण्यांना विभागीय प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
- विकास राऊत
औैरंगाबाद : एकीकडे मराठवाड्यात लोकसभा निवडणुची धामधूम सुरू असताना दुष्काळामुळे चाऱ्याची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ पैकी ६४ लाख ३२ हजार १६७ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार फेब्रुवारी-मार्चपर्यंत पुरेल अशी स्थिती होती. चाराटंचाईमुळे ८७५ छावण्यांना विभागीय प्रशासनाने मंजुरी दिली आहे.
४८१ छावण्या सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये २ लाख ६७ हजार ८३३ जनावरांना चारापाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या बीड आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांतच छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १६ पैकी ३ ठिकाणी छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना जून २०१९ अखेरपर्यंत जनावरे जगविणे अवघड ठरणार आहे. विभागात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी जनावरे आहेत. ११ लाख ३६ हजार ३९४ लहान जनावरे आहेत. शेळ्या व मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात दिवसाला २६ हजार ३३० टन इतका चारा लागतो. मोठ्या जनावरांसाठी दररोज १२ ते २० किलो इतक्या चाऱ्याची आवश्यकता असते. दुष्काळामुळे उपलब्ध चारा घटत आहे. गेल्या पावसाळ्यात मराठवाड्यात कमी पाऊस झाला. ६३ टक्के पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. ४१ तालुक्यांमध्ये गंभीर, मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. पावसाअभावी पिकांचे उत्पादन निम्म्यावर आल्यामुळे चारा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांना जगविण्याचा मोठा प्रश्न आहे.
चारा छावण्यांबाबत शासनाकडून निर्णय झालेला आहे. ८७५ छावण्या मंजूर झाल्या असून, बीडमध्ये ८३७ आणि उस्मानाबादमध्ये ३८ छावण्यांचा मंजुरीत समावेश आहे. ४८१ छावण्या सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये लहान-मोठे मिळून २ लाख ६७ हजार ८३३ जनावरांचा समावेश आहे.
- डॉ. विजयकुमार फड, प्रभारी महसूल उपायुक्त